◻ यशोधन कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील असंघटित कामगारांना साहित्य वाटप
◻ डॉ. जयश्री थोरात यांचा महिलांशी आरोग्याबाबत संवाद
संगमनेर Live | काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी काम केले जात असून अकलापूर परिसरातील ७१ असंघटित कामगारांना साहित्य संचचे वाटप करण्यात आले.
अकलापूर येथे गुरुपौर्णिमेच्यानिमित्त डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सरपंच अरुण वाघ, गौरव डोंगरे, बाळासाहेब कुऱ्हाडे, सौ. प्रीतीताई फटांगरे यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील असंघटित कामगारांना साहित्य संस्थेचे वाटप करण्यात येत आहे. या मध्ये लोखंडी पेटी, हेल्मेट, जेवणाचा डबा, चटई ,सेफ्टी गॉगल, हँड ग्लोज बूट यांसह २१ साहित्याचा समावेश आहे.
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका विस्ताराने खूप मोठा आहे. तरीही काँग्रेसने नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या जात आहे. यशोधन कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला गेला आहे. यातून विमायोजनांसह विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या गरीब कामगारांना मोठी मदत झाली आहे.
पठार भागाने नेहमी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर सातत्याने प्रेम केले असून आमदार थोरात यांनीही गावोगावी अनेक विकास कामे केली आहेत.
अजय फटांगरे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व आमदार निधीतून गावोगावी मोठमोठे विकास कामे सुरू आहेत. यशोधन कार्यालयाच्या वतीने असंघटित कामगारांकरिता सातत्याने मोठी मदत केली जात असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रीती फटांगरे यांनी केले तर सरपंच अरुण वाघ यांनी आभार मानले यावेळी अकलापूर व परिसरातील असंघटित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ. जयश्री थोरात यांचा महिलांशी आरोग्याबाबत संवाद..
कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी गावोगावी महिलांच्या आरोग्या करता विशेष उपक्रम राबवले आहेत. पठार भागातील अकलापूर व इतर गावांमध्ये त्यांनी महिलांमध्ये जाऊन संवाद साधला. यावेळी पावसाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी, आहार, उद्भवणारे आजार यांसह चांगल्या आरोग्याबाबत महिलांना माहिती दिली.