राज्यात स्थापन झालेले सरकार हे जनतेच्या मनातील
संगमनेर Live (लोणी) | पेट्रोल आणि डिझेल वरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय करून सरकारने जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ही तर युती सरकारच्या दमदार कामगिरीची सुरूवात असल्याची प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
मागील अडीच वर्षे राज्यात आघाडी सरकार सतेवर होते. पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून त्यांनी जनतेला दिलासा द्यायला हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून अनेक राज्यांनी कर कपात करण्याचा निर्णय केला होता. परंतू केवळ केंद्र सरकारच्या नावाने टाहो फोडणाऱ्या आघाडी सरकारने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केल्याने सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात संतप्त भावाना होत्या. नव्याने आलेल्या युती सरकारने थेट निर्णयाची अंमलबजावणी करून दाखवली असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात याबाबतच्या केलेल्या घोषणेवर आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यात स्थापन झालेले सरकार हे जनतेच्या मनातील असल्याने त्यांच्या हिताचेच सरकार निर्णय करेल. केंद्रात आणि राज्यात एका विचारांचे सरकार असल्याने सहकार्याचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास या न्यायाने लोकाभिमुख काम करून सरकार दमदार कामगिरी करेल असा विश्वास आ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.