सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

संगमनेर Live
0
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सरकारला खडेबोल

◻ आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी

◻ शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

संगमनेर Live (मुंबई) | अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यावर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व जनता आपल्याकडून काय अपेक्षा करणार.? त्यांचे नैराश्य वाढेल, अपेक्षाभंग होईल, असे खडे बोल काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सुनावले.

विधिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारचा समाचार घेत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आंदोलन करणे हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे पण आता सत्ताधारीच आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्याची सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते. 

शेतकरी आपल्याकडे मोठ्या आशेने पहात असतो. अधिवेशन चालू आहे, आपल्यासाठी काही निर्णय होत आहेत का हे ते पहात असतो पण त्याचवेळी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या सदस्यांना धक्काबुक्की करत आहे, अपशब्द वापरत आहेत. 

सत्ताधारी पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे, त्यांच्या वागण्यातून सत्ता व सरकार आमच्या पाठीशी आहे, विरोधी पक्ष आमच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे पण आजची घटना दुर्दैवी आहे. सत्ताधारी पक्षाला त्यांच्यावर होणारी टीका सहन होत नाही ही गोष्ट योग्य नाही.

हे सरकार आल्यापासून राज्यात १५० शेतकरी आत्महत्या झाल्या. दररोज ३ आत्महत्या होत आहेत. कालच एका शेतकऱ्याने पेटवून घेण्याचा प्रकार घडला तर दुसऱ्याने इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांची मानसिकता दाखवणाऱ्या या घटना आहेत पण सरकार त्यांच्यासाठी काही निर्णय घेत नाही, घोषणा करत नाही. 

३८ वर्ष मी या सभागृहाचा सदस्य आहे. आंदोलन होतात, पायऱ्यावरही बसतात पण अशा पद्धतीने धक्काबुक्की करणे, अपशब्द वापरणे असा प्रकार याआधी झाला नाही. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्याऐवजी अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाने केलेला प्रकार योग्य नाही, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून सर्व पक्षांनी बसून विचार केला पाहिजे असेही थोरात म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला बट्टा..

आज झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे काही आमदार आम्हीच धक्काबुक्की केली आणि पुढे देखील करू, अशी भाषा करतात, हे लोकशाहीला शोभणारे नाही. महाराष्ट्राने आजवर अनेक आंदोलने पाहिली, टोकाचा संघर्ष पाहिला. पण तो संघर्ष आजवर हनामारीवर आला नाही, आज जे झाले त्याचा निषेधच करायला हवा.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !