◻ ना. राधाकृष्ण विखे पाटील याच्यां पाठपूराव्यातून आश्वीसह ७ गावाना निधीची उपलब्धता
संगमनेर Live | शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या संगमनेर तालुक्यातील ७ गावांच्या पाणी पुरवठा योजनेकरीता १३ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून, केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लागणार असल्याची माहीती महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करुन दिली आहे. हर घर जल ही संकल्पना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. शिर्डी मतदार संघातही जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कार्यवाही सुरु झाली असल्याचे सांगतानाच यासर्व पाणी पुरवठा योजनांकरीता मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभले असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
प्रतापपुर, रहिमपुर, आश्वी बु, आश्वी खुर्द, दाढ खुर्द, निबांळे आणि ओझर बुद्रूक या सात गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून, मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या सर्व प्रस्तावांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या गावांतील पाणी योजनांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतापपूर येथील पाणी पुरवठा योजनेस १ कोटी ९९ लाख, रहिमपूर २ कोटी, आश्वी बु. २ कोटी, आश्वी खुर्द २ कोटी, दाढ खुर्द १ कोटी ९९ लाख, निंबाळे १ कोटी ५२ लाख, ओझर बुद्रूक १ कोटी ९९ लाख अशा पध्दतीने या पाणी पुरवठा योजनेच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना लवकरच सुरुवात होवून या सर्व गावांमधील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, पाण्याची समस्याही कायमस्वरुपी सुटेल असा विश्वास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.