संगमनेर Live | शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून या शेतकऱ्यांबरोबर कष्टाने काम करणारा बैल याचे शेतकरी कुटुंबात व त्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असून पोळा या दिवशी त्याचे होणारे पूजन हे भारतीय कृषी संस्कृतीतील आनंदाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे
जोर्वे येथील संत सावली या निवासस्थानी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबीयांसमवेत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी समवेत सौ. कांचनताई थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, संजय थोरात यांसह जोर्वे गावातील शेतकरी बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पारंपारिक पद्धतीने आरती करून बैलाचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सातत्याने कष्ट करतो आणि या शेतकऱ्यांबरोबर शेतात राबणारा कष्ट करणारा बैल हा प्राणी आहे. शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या असलेल्या या बैल, गायीचे आज सर्वत्र पूजन केले जाते. कृषी संस्कृतीत एक आदर्शवत अशी ही पूजन पद्धती आहे.
शेतकऱ्यांच्या जीवाच्या या प्राण्यांबद्दल ऋण व्यक्त करणारा हा सण आहे. पशु प्राणी आणि मानवी जीवन यांची सांगड असलेली कृषी संस्कृती आहे. शेतीमध्ये आधुनिकता आलेली असली तरी या प्राण्यांचे मोठे महत्त्व असून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या या सर्वांच्या प्रति आज कृतज्ञता सर्वत्र व्यक्त होत आहे. हा शेतकरी बांधवांचा अत्यंत आनंदाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.