◻ ५ ते १५ वर्षे वयोगटातील स्पर्धक जिंकणार विविध बक्षिसे
संगमनेर Live | लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने दरवर्षी शाडू मातीच्या गणेशमूर्ती सजावट व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेल्या १० वर्षांपासून अविरत ही स्पर्धा संगमनेरमध्ये भरविली जाते. कोरोना काळातही ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २.३० ते ५ या कालावधीमध्ये ही स्पर्धा मालपाणी लॉन्स संगमनेर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी आणि सर्व सदस्यांनी केले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाचा खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो. जिप्सम, शिसे, कॅडमियम यासारख्या विषारी रसायनांमुळे उध्दभवणारे धोके वेळोवेळी शास्त्रज्ञांनी नमूद केले आहेत. यावर पर्याय म्हणजे नैसर्गिक मातीपासून म्हणजेच शाडू मातीपासून बनविलेल्या शास्त्रशुद्ध मूर्ती स्थापित करणे. परंपरा, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी याचा नवा आदर्श घालून, येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती सजावट व रंगभरण स्पर्धेचे आयोजन केल्याचे प्रकल्पप्रमुख देविदास गोरे व रोहित मणियार यांनी सांगितले आहे.
या स्पर्धेसाठी शाडू मातीचे गणपती स्पर्धकांना देण्यात येणार असून त्यांनी या मूर्तीची सजावट आणि रंगकाम करायचे आहे. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी पोस्टरकलर, ब्रश व आवश्यक सजावटीसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी सोबत आणायचे आहे.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास रोख रु. १ हजार रुपये व प्रशस्तीपत्र, द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास रोख ७०० रुपये व प्रमाणपत्र, तृतीय येणाऱ्या स्पर्धकास रोख ५०० रुपये व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रु. ३०० व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रु. ५० एवढे अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यावेळी स्पर्धकाने रंगविलेल्या गणेशमूर्ती त्यांना विनामूल्य देण्यात येणार असून प्रत्येकाला भक्तिभावाने या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करता येणार असल्याचे अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख देविदास गोरे (९८२२२१०८८७), रोहित मणियार (९४२२७९७६५७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणेशमूर्ती सजावट व रंगभरण स्पर्धेसाठी असणाऱ्या प्रकल्प समितीमध्ये गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, अतुल अभंग, डॉ. अमोल वालझाडे, कल्पेश मर्दा, प्रशांत गुंजाळ, सुनीता मालपाणी, मयूर सारस्वत, पुष्पा गोरे, स्मिता देशमुख, अनन्या धुमाळ आदी पदाधिकारी काम बघत आहेत.