◻ लोणी, आश्वी, जोर्वे, कोल्हार आदि ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण व पेढे वाटप
◻ राज्यासह नगर जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्याकडून आ. विखे पाटील याचां संत्कार
संगमनेर Live | शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात लोणी चे सुपूत्र आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रथम क्रमांकाची शपथ घेण्याची संधी मिळाल्याचा जल्लोष ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करीत पेढे वाटून केला.
आ. विखे पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार ही अपेक्षा ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याला होती. कालच आ. विखे पाटील यांना पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईत येण्याचा निरोप मिळाला होता. त्यानुसार शिर्डी येथे श्री. साईबाबांचे दर्शन घेवून आ. विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले होते.
आज सकाळी ११ वा. शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर आ. विखे पाटील यांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्ह्याला होती. शपथविधी सोहळा सुरु झाल्यानंतर प्रथम क्रमांकांवरच आ. विखे पाटील यांना शपथ घेण्याची संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष अधिकच व्दिगुणीत झाला. लोणी बुद्रूक या त्यांच्या गावी सर्व जेष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यास माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. याप्रसंगी सरपंच कल्पना मैड, एम.वाय. विखे, रंगनाथ विखे, कचरु विखे, किसनराव विखे, अशोक धावणे, लक्ष्मण विखे, दादासाहेब म्हस्के, दिलीप विखे, गोरक्ष दिवटे, प्रविण विखे, नवनीत साबळे, संजय लगड, परशुराम विखे, जालींदर विखे, प्रभाकर विखे यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. विखे पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. गुलालाची मनसोक्त उधळण आणि फटाक्यांची आतीषबाजी करुन, आ. विखे पाटील यांच्या मंत्रीपदाचा जल्लोष लोणी गावासह प्रवरा परिसरातील गावांमध्ये करण्यात आला आहे.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आ. विखे पाटील यांना मंत्रीपदाच्या मिळालेल्या संधी बद्दल आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, आ. विखे पाटील यांच्या अनुभवाचा राज्याला निश्चितच फायदा मिळेल. यापूर्वीही मंत्रीपदाची संधी त्यांना मिळाली. आपल्या अचुक निर्णय क्षमतेतून त्यांनी कृषी, पणन, शिक्षण, परिवहन या विभागांमध्ये लक्षवेधी काम केले असल्याने जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून त्यांची ओळख सर्वसामान्य नागरीकांना आहे. आजपर्यंतच्या राजकीय सामाजिक जीवनाच्या वाटचालीत जनतेचे मिळालेले पाठबळच या संधीसाठी कारणीभूत ठरली असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान आश्वी, जोर्वे, कोल्हार आदि ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण व पेढे वाटप करुन स्थानिक कार्यकर्त्यानी जल्लोश साजरा केला आहे.
मुंबई येथे राज्यासह नगर जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून सत्काराचा स्विकार करत आ. विखे पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, आजीमाजी आमदार तसेच मतदार संघातील सर्व नागरीकांच्या प्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“ सर्वांच्या सहकार्यामुळेच ही मोठी संधी आपल्याला मिळाली असल्याचे सांगतानाच ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्ष देईल ती आपण यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही देतानाच, पक्षाने मला आज प्रथम क्रमांकावर शपथ घेण्याची दिलेली संधी सुध्दा माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण ठरला ” असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.