◻ राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहमदनगर जिल्ह्याला मानाचे स्थान
संगमनेर Live (मुंबई) | राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यास सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.