◻ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
◻ कोरोना काळात महसूल मंत्री पद पणाला लावून जनतेचे प्राण वाचवले
संगमनेर Live | मोठा संघर्ष करून भंडारदर्याचे हक्काचे ३० टक्के पाणी मिळवले. ओढ्या नाल्यांवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. निळवंडे धरण व कालवे हे जीवनाचे ध्यासपर्व मानून धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. आता दोन्हीही कालव्यांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून या कालव्यातून येणारे पाणी आता कोणीही रोखू शकणार नाही असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून आपण सत्तेचा उपयोग हा कायम चांगल्या कामासाठीच केला असल्याचे म्हटले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याची चेअरमन प्रतापराव ओहोळ होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, अमित पंडित, आर. बी. राहणे, कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे, संपतराव डोंगरे, लहानुभाऊ गुंजाळ, नवनाथ आरगडे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग, मिलिंद कानवडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, १९८५ ला संगमनेर तालुक्यातील नेतृत्व संपवण्यासाठी काहींनी बाहेरचा उमेदवार लादला. मात्र जनतेच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवली आणि ही तालुक्याच्या विकासाला दिशा देणारी ठरली. सर्वप्रथम तालुक्यासाठी भंडारदराच्या हक्काचे पाणी मिळवले. ओढ्या नाल्यांवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. त्यानंतर सातत्याने निळवंडे धरण व कालव्यासाठी अविश्रांत काम केले. या धरणाच्या कामासाठी मागील काळातील सर्व मुख्यमंत्री यांचे मोठे योगदान राहिले आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचीही मोलाची सहकार्य मिळाले. ज्यांनी मदत केली त्यांची नावे घेतलीच पाहिजे. निळवंडे धरण आपल्या हातून होणे हे नियतीने ठरवले होते. २०१४ ते १९ च्या काळामध्ये कामे अत्यंत मंदावली होती.
२०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर येताचं १२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. येत्या दिवाळीमध्ये दोनही कालव्यांद्वारे पाणी आणणे हे आपले उद्दिष्ट होते. मात्र सत्ता बदल झाला तरी आता कोणी काहीही केले तरी निळवंडे चे कालव्यांमधून येणारे पाणी कोणीही रोखू शकणार नाही.
नेतृत्वाचा विश्वास, जनतेचे प्रेम यामुळे सातत्याने राज्य पातळीवर हे काम करताना आपण जनसामान्यांच्या विकासासाठी काम केले. तालुक्यातही कधीही कोणाच्या वाटात काट्या टाकल्या नाही. विरोधकांचाही सन्मान केला. सत्तेचा दुरुपयोग केला नाही. आणि म्हणून ही सुसंस्कृत परंपरा आणि राजकारण देशाला दिशादर्शक ठरले आहे. आपला हेतू कायम शुद्ध व प्रामाणिक असून परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे संगमनेर तालुका वैभवशाली ठरला आहे. अनेक मोठमोठ्या विकासाच्या योजना आपण राबविल्या आहेत. मात्र काही जण केवीलवानेपणे उद्घाटने करण्याचा प्रयत्न ही करतील अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
याचबरोबर महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर तातडीने दोन लाखापर्यंतची विनाअट कर्जमाफी केली सातबारा ऑनलाइन केला, मोजणी मध्ये आधुनिकता आणली. कोरोना काळातील ऑक्सिजन संकटामध्ये महसूल मंत्री पद पणाला लावून जनतेचे प्राण वाचवले. तालुक्यातील सहकारी संस्थांनी ही मोठे काम केले. आपण कामे करतो इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही विमानतळ, रेल्वे, विविध रस्त्यांची कामे शहराचे सुशोभीकरण चौपदरीकरण रस्ते यांचा अनेक विकास कामे सुरू आहेत. याचबरोबर कारखान्याने कायम चांगले काम केले असून आगामी काळामध्ये हेक्टरी उत्पादन वाढवावे असे आवाहन केले.
बाबा ओहोळ म्हणाले की, मागील अहवाल सालात कारखान्याने १५ लाख ५३ हजार मे. टन. विक्रमी गाळप केले आहे. आ. थोरात यांचे नेतृत्व हे देशातील राजकारणासाठी मापदंड ठरले आहे. निळवंडे धरण व कालवे हे आ. थोरात यांनीच केले आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. आता श्रेय घेऊ पाहणाऱ्यांचे योगदान काय हा माझा प्रश्न आहे. तालुक्यातील जनतेने पाहण्यासाठी संघर्ष केला आहे. मात्र काही जण सुडाचे राजकारण करत आहेत. आपल्या तालुक्यातील काही लोक घरभेदी झाले आहेत अशाचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. कारखान्याने १८ उपपदार्थाच्या माध्यमातून चांगले उत्पादन केले असून हा कारखाना इतरांसाठी आदर्शवत ठरला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, सौ. मंदाताई वाघ, श्रीमती मिराताई वर्पे, संभाजीराव वाकचौरे, सेक्रेटरी किरण कानवडे, प्रा. बाबा खरात, शंकरराव ढमक, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. प्रोसेडिंग वाचन दत्तात्रय भवर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले
खबऱ्यांचा बंदोबस्त जनता करेल..
संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. येथील सर्व सहकारी संस्था लौकिकास्पद काम करत आहेत. सत्तेचा उपयोग हा जनतेच्या विकासाकरता व चांगल्या कामाकरता केला आहे. कधीही सुडाचे राजकारण केले नाही. मात्र आता काहीजण त्रास देत आहेत. या कामी तालुक्यातून खबऱ्या देणाऱ्यांचा जनताच बंदोबस्त करेल असेही आ. थोरात यांनी सांगितले.