बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात महिला ठार

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील घटनेने तालुक्यात खळबळ

◻ बिबट्याचा महिलेच्या मानेवर प्राणघातक हल्ला

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील मूळच्या रहिवासी (सावरचोळ/ मेंगाळवाडी) येथील मिराबाई रामभाऊ मेंगाळ (वय - ६२) या आदिवासी वृद्ध महिलेवर पहाटे पाच ते साडे - पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला करून ठार मारल्याची घटना उघडकीस आल्याने संगमनेर तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. ६ सप्टेंबरच्या रात्री मिराबाई आपल्या निमगाव खुर्द येथील चंदन टेकडी परिसरात असणाऱ्या घराच्या ओट्यावर त्यांचा एक मतिमंद मुलगा व त्या झोपलेल्या असताना पहाटे पाच ते साडे - पाच वाजेच्या सुमारास सावजाच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मिराबाई मेंगाळ यांच्या मानेवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ७०० ते ८०० मीटर पर्यंत फरपटात ओढत नेले. 

परंतु बिबट्याने ज्या वेळेस हल्ला केला त्यावेळेस वृद्ध महिलेने मोठ्याने आरडाओरडा केला परंतु आपल्या मतिमंद मुलाला बचावासाठी काहीही करता आले नाही. पहाटेच्या सुमारास अचानक झालेले आरडा ओरड्याने परिसरातील नागरिकांनी मेंगाळ यांच्या घराकडे धाव घेतली. येथील नागरिकांना बिबट्याच्या पाऊलखुणांमुळे बिबट्याने हल्ला केला असल्याची बाब लक्षात येतच  त्यांनी रस्त्याने फरपटत नेलेल्या जागेवरून ८०० ते ९०० मीटरच्या अंतरावर या वृद्ध महिलेचा मृतदेह मानेला व छातीला खोलवर झालेल्या जखमी अवस्थेत आढळून आला.

बिबट्याने या वृद्ध महिलेला फरपटत नेत असताना त्यांच्या अंगावरील कांबळा व इतर वस्त्र ही फरपट असलेल्या जागेवर तुटून गेल्याने विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. लागलीच निमगाव खुर्द येथील वन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ वनक्षेत्रपाल विभाग १ चे वनक्षेत्रपाल सचिन लोंढे यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आले. 

तसेच निमगाव खुर्द चे कामगार पोलीस पाटील गोरक्षनाथ गोपाळे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर दिली. घटनेची खबर करतात संगमनेर वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वनपाल संगीता कोंढार, जोस्ना बेंद्रे, वरकोड कोळी यांनी घटनास्थळी येऊन स्पॉट पंचनामा करून, शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आले. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याने बिबट्यांचा मुक्त संचार मानव वस्तीत दिवसाढवळ्या दिसून येत आहे. वारंवार या भागामध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याने पर्यायी बिबट्यांना भक्ष कमी पडत असल्याने नरभक्षक बिबटे वाढण्याची शक्यता आहे. तरी वन विभागाने या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा आदिवासी बांधव मोठे आंदोलन करू अशा संतप्त प्रतिक्रिया आदिवासी बांधवांनी व्यक्त केली.

बातमी सौजन्य :- पत्रकार अमोल मतकर

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !