◻ पोलीस यंत्रणेसह सर्व घटकांना दक्षता घेण्याचे आवाहन
संगमनेर Live (अहमदनगर) | दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात ६ सप्टेंबर पासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
घरमालक, लॉजमालक, सायबर कॅफेचालक, मालक, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस, ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते व जूने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संशयास्पद, अनोळखी व्यक्तींची माहिती न लपविता तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात यावी. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेसह सर्व घटकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशातून केले आहे.
दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याबरोबरच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे, दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार लागू करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील घरमालकांनी, घर भाडेकरूंना भाड्याने घर देतांना भाडेकरुबाबतची सर्व सविस्तर माहिती घेवून त्यांचे ओळखपत्र, (उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय ओळखपत्र) फोटोसह स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी व अहमदनगर पोलीस दलाच्या ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती भरावी.
लॉज मालकांनी आपणाकडे येणारे सर्व प्रवाशांची माहिती ओळखपत्रासहित संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेऊन त्यांची सविस्तर नोंद व सही विहीत नमुन्यातील रजिस्टरला घेऊनच प्रवाशांना लॉज मध्ये प्रवेश द्यावा. तसेच प्रवाश्यांची घेण्यात आलेली सर्व माहिती रेकॉर्ड २ वर्षापर्यंत जतन करुन ठेवावे.
सायबर कॅफे चालक, मालक यांनी येणारे ग्राहक महिला, पुरुष यांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. एखाद्या संशयीत व्यक्तिस इंटरनेट वापरासाठी देऊ नये. इंटरनेटचा वापर करणारे आक्षेपार्ह वेबसाईटवर सर्च करतात अगर कसे याबाबत सायबर चालकांनी लक्ष ठेवावे. तसेच एखादी आक्षेपार्ह वेबसाइट सुद्धा वापरण्यास, आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास वेबसाईट वापर करु देऊ नये.
मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनी, मोबाईल सिमकार्ड विक्री करतेवेळी सिमकार्ड धारकाचे ओळखपत्र व फोटो घेऊन सिमकार्ड घेणारा तोच आहे किंवा कसे याची खात्री करावी व आपले विहित नमुन्यातील रजिष्ट्ररवर त्यांचा फोटो चिकटवून त्यांची इत्यंभूत माहिती नोंदवावी. जेणेकरून सीमकार्डचा दुरुपयोग होणार नाही. यापूर्वी ज्या व्यक्तीचे नावाचे सिमकार्ड आहे त्याच्या संमतीशिवाय इतर अनोळखी व्यक्ती सिमकार्ड वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार घडू नये म्हणून वितरकांनी दक्षता घ्यावी.
प्रिंटिंगप्रेस, ऑफसेट चालकांनी आपणाकडे धार्मिक मजकूर छापतेवेळी माहिती प्रकाशित करणाऱ्या व्यक्तिचे ओळखपत्र आवश्यक घ्यावे. त्यात काही आक्षेपार्ह मजकूर छापला जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेसमध्ये छापले जाणारे सर्वच निमंत्रणपत्रिका, माहितीपत्रके, बॅनर, भित्तीपत्रके इत्यादी प्रेसचे ठळक नाव छापून मोबाईल नंबर दर्शवावा.
विस्फोटक गोदाम परवानाधारक यांनी विस्फोटक, ज्वलनशील साठा ठेवणे, विक्री, खरेदी करणे इत्यादी ठिकाणी नेहमी विस्फोटक वस्तू सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. देवाण-घेवाण, खरेदी-विक्री करतांना योग्य ते कायदेशीर नियम अटी व शर्तीचे पालन करावे. व्यवहार झालेल्या व्यक्तींचा ओळख तपशील घ्यावा व अभिलेख अद्यावत ठेवावे. सदर ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत वेळोवेळी तपासणी करावी.
भंगार विक्रीतील मोटारसायकलच्या वस्तू व इतर वस्तू यांचा उपयोग देशविघातक घातक कृत्ये करणेसाठी केल्याचे दिसुन आले आहे. त्या अनुषंगाने भंगार खरेदी विक्री करणारे दुकान मालक व चालक यांनी माल विकत घेतांना व विक्री करतांना संबंधित व्यक्तिचे ओळखपत्र पत्ता मोबाईल नंबर सह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विहित नमुन्यातील रजिस्टर ठेवून त्यावर नोंद घेण्यात यावी. तसेच पोलीस प्रशासनामार्फत वेळोवळी तपासणी करतेवळी सदर अभिलेख उपलब्ध करावा.
जुने वाहन खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदार चालक, मालक यांनी नमूद वाहन विक्री करणारा व खरेदी करणारे व्यक्तींची माहिती ओळखपत्र पत्ता मोबाईल नंबर सह विहित रजिस्टरला घेऊन ती खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवूनच मोटार वाहन अधिनियम प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेश अहमदनगर शहर व जिल्ह्यात पुढील दोन महिन्यासाठी लागू राहतील. असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे.