◻️ पोलीस शहिदांच्या कुटुंबियांची भेटी
संगमनेर Live (मुंबई) | कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कर्तव्यावर असताना हौतात्म्य आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी करण्यात येते. मागील वर्षी देशभरात विविध पोलीस दलांतील ६२ अधिकारी व २०२ कर्मचारी शहीद झाले आहेत. या पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने वीरमरण आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित विविध देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.