◻️'राहाता' येथे 'आनंदाचा शिधा' कीट वाटपाचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
◻️अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकऱ्यांस मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याची महसूलमंत्र्यांची ग्वाही
******
संगमनेर Live (शिर्डी) | राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने गरिबांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. 'आनंदाचा शिधा' देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शासनाने जाहीर केलेला 'आनंदाचा शिधा' चे कीट जिल्ह्यात पोहचले आहेत. या शिधा वाटप उपक्रमाचा जिल्ह्यातील शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते आज राहाता येथून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
महसूलमंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, आनंदाच्या शिधा' कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर पामतेल वाटप केले जाणार आहे. राहाता तालुक्यात ५० हजार ३९ कीट प्राप्त झाले आहेत. याचे पुढील दोन दिवसांत वाटप केले जाईल.
अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकऱ्यांस मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याची महसूलमंत्र्यांची ग्वाही..
लोकांचे हित साधणारे हे सरकार आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानीचे पंचनामे करण्याचे सरकारने दिले असून झालेल्या नूकसानीची वस्तूस्थिती समोर आल्यानंतर मदतीचा निर्णय घेतला जाईल. राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी सरकार निश्चित घेईल. अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी राहाता तहसीलदार कुंदन हिरे, पुरवठा निरीक्षक भारत खरात तसेच राहाता ग्रामस्थ मुकुंदनाना सदाफळ, सोपानकाका सदाफळ, नानासाहेब बोठे, रघुनाथ बोठे, राजेंद्र वाबळे, सुरेश गाडेकर, अंबादास गाडेकर, भाऊसाहेब जेजूरकर, सचिन मेसेजेस, विजय बोरकर व भाकडीनाना सदाफळ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शासनाने दिवाळीपूर्वी 'आनंदाचा शिधा' दिल्यामुळे आमची दिवाळी गोड झाली आहे." अशा भावना शिधा मिळालेले वंदना पिलगर, शितल पिलगर, रूपाली यादव, उज्ज्वला निकम व तईबाई पवार या लाभार्थ्यानी व्यक्त केल्या आहेत.