◻️ बर्डे कुटुंबात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी ; पावसाळ्यामध्ये वीज वितरण विभागाने काळजी घ्यावी - इंद्रजीत थोरात
◻️ यशोधन कार्यालयाचा पुढाकार
संगमनेर Live | मागील आठवड्यामध्ये विजेचा शॉक लागून पठार भागातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथील बर्डे कुटुंबातील चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाठपुरावा होत असून त्यांच्या यशोधन संपर्क कार्यालय मार्फत जीवनावश्यक वस्तू त्यांना देण्यात आल्या.
वांदरकडा येथे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी बर्डे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना जीवनावश्यक वस्तू सुपूर्त केल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सरपंच शिवाजी फणसे, सुधीर शेळके, जयराम ढेरंगे, अरुण वाघ, दत्तात्रय आभाळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, विक्रम कजबे, बाळासाहेब कुराडे, रमेश गपले, अक्षय ढोकरे, अविनाश आव्हाड आदींसह यशोधन कार्यालयाचे जनसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांदरकडा येथील बर्डे कुटुंबातील चार बालके विजेचा शॉक लागून अत्यंत दुर्दैवीरीत्या मृत्युमुखी पडले. या घटनेने संपूर्ण पठार भागासह संगमनेर तालुक्यात मोठी हळहळ निर्माण झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या.
याचबरोबर दोन किलोमीटर पायी चालत जाऊन या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शासन स्तरावर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. याचबरोबर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर यशोधन कार्यालयाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू बर्डी कुटुंबियांना देण्यात आल्या.
यावेळी बोलताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. बर्डे कुटुंबात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पावसाळ्यामध्ये अशा घटना जास्त घडत असून अशा घटना होऊ नये यासाठी वीज वितरण विभागाने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात अत्यंत काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले.