◻️ ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक चंद्रकांत पाटील तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. कान्हूजी गिरमकर उपस्थित
◻️ त्रिंबकजी डेंगळे यांचे मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान
*****
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची १९३ वी पुण्यतिथी रविवारी (१६ ऑक्टोबर) साजरी करण्यात आली असून नागपूर विद्यापीठातून त्रिंबकजी डेंगळे या विषयात पीएचडी करुन आपला प्रबंध पुस्तकरूपाने प्रकाशित केलेल्या डॉ. उज्ज्वला साळवे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी गावातील मारुती मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. उज्ज्वला साळवे यांचा संत्कार ग्रामस्थांच्या वतीने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्तें करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक चंद्रकांत पाटील तसेच कोपरगावच्या के. जे. सोमैय्या महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख व पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. कान्हूजी गिरमकर यांच्यासह मच्छिंद्र थेटे, विठ्ठल शेवाळे, सुमित डेगंळे, बाबा डेगंळे, रामकृष्ण लव्हाटे, पोलीस पाटील दिलीप डेगंळे, सरपंच अमोल जोधळे, ठक्काजी थेटे, दिलीप डेगंळे, पद्मावती नाईक - जाधव, प्रा. दिपक डेगंळे आदि उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज व त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुमित डेंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. उज्ज्वला साळवे यांनी त्रिंबकजी डेंगळे यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आलेख प्रेक्षकांसमोर मांडला.
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धकाळातील संशोधनाबद्दल सांगितले. तसेच त्रिंबकजी डेंगळे यांचं मराठ्यांच्या इतिहासात नेमकं स्थान काय हे स्पष्ट केले. त्रिंबकजी डेंगळे यांच्या ठाण्याच्या तुरुंगातून पलायनाचे अनेक बारीकसारीक तपशील त्यांनी सादर केले.
दरम्यान हा कार्यक्रम संपल्यानंतर पाहुण्याणी सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा परिसरात ऐतिहासिक वास्तूची पाहणी देखील केली.