◻️अकोले तहसीलमध्ये ५ हजार ९६५ प्रकरणे निकाली
◻️सेवापंधरवड्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम
संगमनेर Live | सेवा पंधरवड्यात संगमनेर महसूल उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत १९ हजार ५२३ प्रकरणांचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे संगमनेर तहसीलने दोन दिवसातच विशेष सहाय्य योजनेच्या २ हजार ९३३ लाभार्थ्यांना थेट गावात जाऊन हयातीचे दाखले दिले आहेत.
महसूल विभागाच्या सकारात्मक पावलांमुळे सेवा पंधरवडा सर्वसामान्यांसाठी लाभदायी ठरला आहे. संगमनेर महसूल उपविभागाने प्रकरणांचा जलद निपटारा करून लोकाभिमुख तत्पर प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विकासाचे विविध उपक्रम राबवण्या बरोबरच जनतेचे प्रश्न (तक्रारी) निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असतात; नियमित प्रक्रियेत मागे पडतात. यामुळे संबंधिताना व्यवहारात अडचणी येऊ शकतात, अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचा संगमनेर महसूल उपविभागाने पुरेपूर उपयोग करून घेतला.
या पंधरवड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत, पंतप्रधान किसान सन्मान निधी, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये अर्ज, शेतरस्ते, तुकडेजोड व तुकडेबंदी नियमितीकरण, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, तात्पुरता रहिवास दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, अधिकार अभिलेखची प्रमाणित प्रत, अल्पभूधारक दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, डोंगर, दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचा दाखला, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे आदी प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यात आला.
संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेलेल्या या मोहीमेत संगमनेर तहसीलमध्ये १३ हजार ५५८ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. अकोले तहसीलमध्ये ५ हजार ९६५ प्रकरणे निकाली काढून मार्गी लावण्यात आली.
‘‘संगमनेर तहसीलस्तरावर प्राप्त प्रकरणांचा दैंनदिन निपटारा करण्यात येत असतो. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहत नाहीत. सेवापंधरवड्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे हयातीचे दाखले थेट गावातच उपलब्ध करून देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत दोन दिवसातच तहसीलयंत्रणेच्या सांघिक मेहनतीमुळे २९३३ हयातीचे दाखले ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले असल्याचे तहसिलदार अमोल निकम यांनी सांगितले.
‘‘सेवा पंधरवड्यात महसूल विभागाशी संबंधित व तालुका प्रशासनाची निगडीत विविध लोकोपयोगी कामांचा जलद निपटारा करण्यास प्राधान्ये देण्यात आले. हयातीचे दाखले वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांची प्राप्त प्रकरणे रोजच निपटारा करण्यावर प्रशासनाचा भर आहे. यापुढे ही नागरिकांना लोकाभिमुख व जलद सेवा देण्यावर भर राहील. ’’ अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे.
सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वच..
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने महसूल विभागासह इतरही सर्वच विभागातून नागरीकांची प्रलंबित काम मार्गी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व' हा दिलेला मंत्रच सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने कृतीत उतरवण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.