दैनदिन राज्यात दूध व्यवसायात १३५ कोटींची उलाढाल
शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय ; खेडो-पाडी आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत
दुग्ध व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने या व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे
संगमनेर Live | अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरी दिवाळीचा दिवा लागू शकतो, तो केवळ दूध धंद्यामुळे. सुरुवातीच्या काळात शेतीला दुग्धव्यवसाय हा जोडधंदा असेच या व्यवसायाचे स्वरूप होते. मात्र, गेल्या काही दशकांत दुग्धव्यवसाय चांगलाच विस्तारला.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय आता खरे तर, मुख्य व्यवसाय बनला आहे. खेडोपाडी आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा दुग्धव्यवसायाने पेलला आहे. दुग्धक्रांतीनंतर हा व्यवसाय आणखी प्रवाहीपणे सर्वत्र पसरला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी हातभार लागला.
शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक घटक परिणाम करतात. कधी निसर्गाची अवकृपा, तर कधी शेतमालाला मिळणाऱ्या दरातील तफावत यामुळे शेती कायम अडचणीत राहिली आहे. शेतीतील या अस्थिरतेमुळे दुग्धव्यवसाय हा सक्षम पर्याय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वाटला.
महाराष्ट्रात जवळपास पस्तीसहून अधिक मोठ्या सहकारी दूध संस्था व पंचवीस हजारांवर दूध डेअरी आहेत. खासगी दूध संस्थांची संख्या शेकडोच्या संख्येत आहे. तीस ते चाळीस हजार छोटे छोटे एजंट दूध संकलन आणि पुरवठा करतात. महाराष्ट्रातील रोजच्या दूध संकलनात साठ टक्के वाटा खासगी क्षेत्राचा, तर चाळीस टक्के दूध संकलन सहकारी संस्थांच्या संघाचा आहे. एक कोटी लोक या व्यवसायात आहे.
रोज राज्यात दीड कोटी लिटरपेक्षाही अधिक दूध संकलन होते. प्रत्यक्ष उत्पादन मात्र तीन कोटी लिटर होते. म्हणजे रोज राज्यात या व्यवसायात १३५ कोटींची उलाढाल होते. यावरून हा व्यवसाय राज्याच्या प्रगतीत आणि शेतकऱ्यांच्या प्रपंचाला किती मोठा हातभार लावतो हे लक्षात यावे.
गेली दोन वर्ष कोरोना, लॉकडाऊन यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. दुधाचे भाव पडले. दुग्ध व्यवसाय राबणाऱ्या कुटुंबाची रोजंदारीही सुटत नव्हती, अशा परिस्थितीत केवळ पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी हमाली केली, पण हा व्यवसाय जगवला. आता गेल्या सहा महिन्यापासून दुधाला चांगला दर मिळत आहे, पण तरीही या व्यवसायातील अडचणींचा पाढा कमी झालेला नाही.
लंपी रोगाचा प्रादुर्भाव अद्यापही टिकून आहे. दुसरीकडे पशुखाद्याच्या, पशुवैद्यकीय औषधांच्या, चाऱ्याच्या आणि जनावरांच्या किमतीतली वाढ यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फार काही उरत नाही. पण तरीही शेतकऱ्याच्या संसाराचे आर्थिक चाक दूध धंद्यातून मिळणाऱ्या शाश्वत पैशामुळे फिरते.
दिवाळी सारख्या सणाला दुधाच्या रिबिट पोटी मिळणाऱ्या रकमेतून ओढून-ताढून का होईना शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होते. शेती आधीच अडचणीत असताना परतीच्या पावसाने केलेल्या तांडवामुळे ती आणखी उध्वस्त झाली.
ज्यांच्याकडून मदतीची आशा आहे, ते सरकार पंचनाम्यापेक्षा फार काही करू शकलेले नाही. सरकारी मदत अद्याप दिवा स्वप्न आहे. उद्या राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. शेताचं तळ झालेल असताना ती साजरी करण्यात शेतकऱ्याला फार काही आनंद नाही, परंतु लेकरा बाळांसाठी कपड-लते, गोडधोड वर्षभर राबणाऱ्या आया-बायांसाठी वर्षातून एकदा मिळणारी साडी असा दिवाळीचा सण, दीपोत्सवाचा दिवा केवळ दूध धंद्यामुळे शेतकऱ्याच्या घरी लागणार आहे. म्हणून अडचणीचा असला, भेसळखोरांमुळे बदनाम झालेला असला तरीही दुग्ध व्यवसाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तारणहार ठरला आहे.
जिथ दूध धंदा नाही, त्या भागातल्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र खऱ्या अर्थाने अंधारात साजरी होणार आहे. म्हणून दुग्ध व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने या व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात स्वतंत्र दुग्ध विकास मंत्रालय आहे. त्यासाठी मंत्री, सचिव, दुग्धविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी अशी यंत्रणा काम करते. पण या मंत्रालयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे काय भले झाले, हा खरा तर संशोधनाचा भाग आहे. तो शासनाच्या इतर मंत्रालयांप्रमाणे अलहिदा. आज अडचणीतील शेतकऱ्याला सणासुदीचे काळात दूध धंद्याने दिलेला आर्थिक आधार महत्त्वाचा म्हणून हा लेख प्रपंच.
विकास अंत्रे
लेखक दै. पुण्यनगरीच्या अहमदनगर आवृत्तीच्या उत्तर विभागाचे वृत्त संपादक आहेत.