◻️ रस्ता खराब असल्याने मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिके पर्यत आणले
संगमनेर Live (राजू नरवडे) | शनिवारी सकाळी नाशिक - औरंगाबाद रस्त्यावर बस दुर्घटनेत ११ जणाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाचं संगमनेर तालुक्यात वीजेच्या धक्याने चार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उजाडात आल्यामुळे तालुका हादरला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि. ८) ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. यामुळे पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून अनिकेत अरूण बर्डे (वय - ८), ओंमकार अरुण बर्डे (वय -७), दर्शन अजित बर्डे (वय - ६) व विराज अजित बर्डे (वय - ५) अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे असल्याची माहिती समोर आली असून एकाचं कुटुंबातील मुले असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी अनिकेत बर्डे, ओंकार बर्डे, दर्शन बर्डे, विराज बर्डे हे चौघे जण खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान विजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही लहाण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे यांनीही घटनास्थळी दाखल होत नागरीकाच्या मदतीने या चारीही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
याचंदरम्यान पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे साहयक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. चारीही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी चारीही मुलांच्या मृत्यूमुळे उपस्थिताना अश्रु अनावर झाले होते. याप्रसंगी आई- वडीलांनी हंबारडा फोडला होता. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारीही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिके पर्यत आणले होते.
दरम्यान यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.