◻️ ‘आनंदाचा शिधा' कीट वाटप व शिर्डी अतिवृष्टीबाधित भागांची महसूलमंत्र्यांकडून पाहणी
◻️ निमगाव व आजूबाजूच्या खंडकरी शेतकऱ्यांना प्रश्न दिवाळीनंतर सुटणार
◻️ शिर्डी अतिवृष्टीबाधित भागांची पाहणी
संगमनेर Live (शिर्डी) | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे शंभर टक्के पंचनामे करण्यात येतील. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच निमगाव व आजूबाजूच्या खंडकरी शेतकऱ्यांना प्रश्न दिवाळीनंतर सोडविण्यात येतील. अशा शब्दात राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
शासनाच्या 'आनंदाच्या शिधा' कीट वाटप लोणी बु., लोणी खुर्द व शिर्डी विकास सोसायटी स्वस्त धान्य दुकान येथे महसूलमंत्र्यांची हस्ते करण्यात आले. त्यांनतर निमगाव येथे ग्रामस्थांवतीने महसूलमंत्र्यांचा नागरी सत्कार व विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महसूलमंत्री ना. विखे पाटील बोलत होते.
महसूलमंत्री ना. विखे पाटील म्हणाले, राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने गरिबांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. 'आनंदाचा शिधा' देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. आनंदाच्या शिधा' कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर पामतेल वाटप केले जाणार आहे. राहाता तालुक्यात ५० हजार ३९ कीट प्राप्त झाले आहेत.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांच्या अनुदानाचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. लम्पी आजारांवर शासनाने यशस्वी नियंत्रण मिळविले आहे. असेही विखे पाटील यांनी सांगितले.
लोकांचे हित साधणारे हे सरकार आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानीचे पंचनामे करण्याचे सरकारने दिले असून झालेल्या नूकसानीची वस्तूस्थिती समोर आल्यानंतर मदतीचा निर्णय घेतला जाईल. राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी सरकार निश्चित घेईल. अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.
शिर्डी अतिवृष्टीबाधित भागांची पाहणी..
महसूलमंत्री ना. विखे पाटील यांनी शिर्डी मधील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागांची अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. यामध्ये हॉटेल सन अँण्ड सन्स परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोले तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिर्डीचे नाले व ओढ्यावरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटविण्यात यावे. भविष्यात पाणी तुंबण्याची घटना घडणार नाही. यासाठी शाश्वत काम करण्याच्या महसूलमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.