◻️ ना. विखे पाटील गटाचे सदंस्य देणार राजीनामे.?
संगमनेर Live | शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीत महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे बहुमत असताना चिठ्ठी काढून झालेल्या निवडणूकी प्रक्रियेत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाचे प्रमोद बोद्रें यांची सरपंच पदी निवड झाल्यामुळे विखे गटाला हा आश्वी जिल्हापरिषद गटात मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे विखे पाटील गटाचे सदंस्य राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिबलापूर ग्रामपंचायतीवर ना. विखे पाटील यांच्या गटाची बहुमताची सत्ता असून सुरवातीला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे सरपंच सचिन गायकवाड यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नवीन सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला होता.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यलयात निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असता ना. विखे पाटील गटाकडून सचिन विनायक गायकवाड व शुंभागी दिपक रक्टे यानी तर आ. थोरात गटाकडून प्रमोद बोद्रें यानी सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीत तीनही अर्ज राहिल्यानतंर विखे गटाच्या सचिन गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
ना. विखे पाटील गटाचे ७ सदंस्य तर आ. थोरात गटाच्या ३ सदंस्यानी गुप्त पद्धतीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भाग घेतला. याआधी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्यामुळे दोन्ही उमेदवाराना सम-समान म्हणजे ५ मते पडली. त्यामुळे सरपंच पदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार यानी वरीष्ठाशी चर्चा करुन चिठ्ठी टाकून निर्णय घेण्याचे जाहीर केले. यावेळी ४ वर्षाच्या मुलाच्या हस्तें सरपंच पदाची चिठ्ठी काढली असता त्यामध्ये प्रमोद बोद्रें यांचे नाव निघाल्यामुळे त्याचे नाव घोषित करण्यात आले.
दरम्यान या सर्व प्रक्रीयेत निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार याना कामगार तलाठी ए. आर. आव्हाड, ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ नागरे, रमेश मुन्तोडे, दिपक मुन्तोडे व वैभव वाघ यानी सहकार्य केले. याप्रसंगी आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरिक्षक शिवाजी पवार व त्याचे सहकारी उपस्थित होते.
शिबलापूर ग्रामपंचायतीत ना. विखे पाटील गटाचे बहुमत असून आमचे ७ ग्रामपंचायत सदंस्य आहेत. या निवडणूक प्रक्रीयेत आमचे बहुमत असतानाही विरोधी गटाचा सरपंच गुप्त मतदान प्रक्रियेत निवडून येणे हे दुर्दैव आहे. त्यामुळे आमच्या गटाचे सर्व सदंस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असून लवकरचं ना. विखे पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. अशी प्रतिक्रिया ना. विखे पाटील गटाचे ग्रामपंचायत सदंस्य प्रकाश शिदें यांनी दिली आहे.