◻️ आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेगाव मध्ये ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी - आ. डॉ. तांबे
संगमनेर Live | प्रेमाचा व एकतेचा संदेश देत कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी संगमनेर मधील हजारो कार्यकर्ते रवाना झाले असून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व या यात्रेचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथील होणाऱ्या ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉ. तांबे यांनी दिली आहे.
यशोधन संपर्क कार्यालय येथून काँग्रेस पक्ष, पुरोगामी संघटना व इतर मित्र पक्षांचे विविध कार्यकर्ते बुलढाणा व शेगाव येथील सभेसाठी रवाना झाले. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी आहे. आ. थोरात यांनी केलेल्या काटेकोर पद्धतीच्या नियोजनामुळे भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून ही यात्रा दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ३८२ किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा जात आहे.
शेगाव येथे शुक्रवार दिनांक १८ रोजी भव्य व ऐतिहासिक सभा होणार आहे. याकरता अहमदनगर जिल्हा व संगमनेर मधून काँग्रेस पक्ष, पुरोगामी व इतर मित्र पक्षाचे हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पद यात्रेत हे कार्यकर्ते सहभागी होणार असून शेगाव येथील सभेसाठी ही उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या कार्यकर्त्यांकरता टी-शर्ट व भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेगाव येथे खासदार राहुल गांधीं सह श्रीमती सोनिया गांधी व महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याने या सभेची जय्यत तयारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. सुमारे १९ एकरावर असलेल्या भव्य दिव्य मैदानावर ही सभा होत आहे.
या सभेकरता अडीच लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पदयात्रा व सभेसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे आदिं सह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारत माता की जय, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.