◻️
◻️किसान सभेकडून वीज वितरण कंपनीचा तीव्र धिक्कार
संगमनेर Live | विजेच्या तारांमधून वाहणाऱ्या वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने कातळापुर मधील शेळीपालन करणाऱ्या बुधाबाई देवराम गावंडे या महिलेचा आज दि. ३० नोव्हेंबर रोजी जागेवरच मृत्यू झाला आहे.
उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करणाऱ्या या श्रमिक महिलेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अत्यंत दुःखाची व वीज वितरण कंपनीच्या बाबत अत्यंत संतापाची भावना आहे. विजेच्या तारा वेळीच आजूबाजूच्या झाडाच्या फांद्यांपासून दूर न केल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.
अकोले तालुक्यात वीज महामंडळाचे वाहक पोल अत्यंत चुकीच्या पद्धतीने शेतामधून तसेच रस्त्याच्या कडेने झाडांच्या फांद्यामधून उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे दैनंदिन काम करत असताना शेतकरी व श्रमिक कुटुंबामध्ये अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत.
वीज वितरण कंपनीने तातडीने या महिलेच्या घरच्यांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे, वीज वितरण कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तालुक्यात अशा प्रकारे धोकाग्रस्त असणाऱ्या वीज तारा झाड व शेत पिकांपासून सुरक्षित अंतरावर उभ्या कराव्यात.
शेतांमधून वाहक तारकांना पडलेले झोळ तातडीने दुरुस्त करावेत व कमकुवत झाल्याने कधीही तुटू शकतील अशा तारा तातडीने बदलून द्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, ज्ञानेश्वर काकड, एकनाथ गिऱ्हे, भीमा मुठे यानी केली आहे.