◻️ बिबट्यानतंर आता परिसरात तरसाची दहशत
◻️ शेतकऱ्यानो रात्री अपरात्री बाहेर पडताना खबरदारी घ्या
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात शनिवारी सकाळी आश्वी - दाढ रस्त्यावरील कुरण परिसरात तरस सदृष्य प्राणी वावरताना आरोग्य सेवक दिपक महाजन यांच्या नजरेस पडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोग्य सेवक दिपक महाजन हे शनिवारी सकाळी ६ वाजेच्या दाढ - आश्वी रस्त्याने चालले होते. यावेळी कुरण परिसर म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदिवासी कुटुंबाच्या वस्तीलगत एक तरस सदृष्य प्राणी त्याना दिसल्याची माहिती मिळाली असून यामुळे बिबट्यानतंर तरसाच्या वावरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरस हा श्वान प्रकारातील प्राणी असून आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरावर पट्टे असलेले तरस आढळून येतात. तरसाचा जबडा हा इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मेलेल्या गाई, म्हशी यांची मोठी हाडे फोडून हे तरस खाऊ शकतात इतका मोठा यांचा जबडा कठीण असतो.
तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतर प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांची हडे उरलेले मांस हा प्राणी खातो. तसेच इतर छोट्या प्राण्यांची शिकार करुन देखील तो खात असला तरी, तरस सहसा मानवी वस्तीत येत नाही. मानवी वस्तीत आला तर तो कोंबड्या आणि इतर प्राणी खाण्यासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मानवाशी तरसाचा सामना झाल्यास अघटीत घडण्याची भिती व्यक्त होत असल्याने शेतकरी व नागरीकानी रात्री अपरात्री बाहेर पडताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान या घटनेनतंर काही महिन्यापूर्वी आश्वी खुर्द येथिल बाजारतळालगत राहत असलेल्या कृष्णा हारदे या तरुणाच्या घराशेजारी दोन तरस आल्याचा विडोओ वायरल झाला आहे.