◻️ नाशिक येथील भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची कोणतीही नोंद नाही
◻️ भूकंपाबाबत अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये
◻️ भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे काय काळजी घ्याल.. वाचा सविस्तर
संगमनेर Live | अहमदनगर जिल्ह्याचे ग्रामीण भागामध्ये विषेशतः संगमनेर परिसरातील आश्वी परिसरात व राहुरी तालुक्यातील काही भागामध्ये काल मंगळवार दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसलेबाबत उलटसुलट चर्चा सोशल मिडियाच्या माध्यमातून रात्री उशीरापर्यत सुरु होती. त्यामुळे स्थानिक नागरीकानमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्याने भूकंपमापन केंद्र मेरी, नाशिक येथील अधिकाऱ्यायांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांचेकडील भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने संगमनेर Live ला कळवली आहे.
तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. भूकंपाबाबत अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास ठेवू नये. घरांना हादरा बसल्यास नागरिकांनी सुरक्षितरित्या घराबाहेर पडावे. जुनाट, मोडकळीस आलेल्या वा दगड मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेषतः दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नागारकानी भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजी..
भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घेणे, घराची नियमित पाहणी करुन दुरुस्ती करणे जरुरीचे आहे, भिंतींना तडे गेले असतील तर ते बुजविणे व भिंतींची मजबुती करणे आवश्यक आहे, लोडबेअरींग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोपऱ्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह कॉक्रीट वापरणे व त्याची प्लॉथ, लिटल व रुफ बेन्डमध्ये सांधणी करणे आवश्यक आहे.
आपल्या घरातील व कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक इमारतीमधील सुरक्षीत बाहेर पडण्याचे मार्ग जाणून व समजून घ्या, अवजड आणि मोठ्या वस्तू शक्यतो जमिनीलगत ठेवा उंच जागेवर ठेऊ नका. घरातील कपाटे, अवजड फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थीत लावाव्यात.
भूकंपादरम्यान काय करावे..
स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही घरात, इमारतीच्या आत असाल, टेबलाखाली अथवा पलंगाखाली बसून स्वतःचा बचाव करा. कॉलमजवळ, दरवाजाच्या चौकटीखाली उभे राहुन स्वतःचा बचाव करा, लिफ्टचा वापर करु नका, दाराजवळ अथवा प्रवेशव्दाराजवळ गर्दी करु नका.
भिंती, आरसे, फर्निचर, कंदील यांचेपासून लांब रहा, शक्यतो चादर, उशी अथवा कपडयाची घडी डोक्यावर घ्या, जेणेकरून इजा होणार नाही, जर तुम्ही रस्त्यावर असाल तर पटकन मोकळ्या जागेत जा, घाई गडबड करु नका, रस्त्याच्या कडेने जात असाल तर उंच जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून लांब रहा, भिंती विजेच्या तारा आणि अंगावर पडण्याची शक्यता असेल अशा वस्तूपासून दूर रहा, जर तुम्हा गाडी चालवत असाल तर जुन्या इमारती, भिंती, इलेक्ट्रीक वायर, केबल व उंचवटा यापासून आपले वाहन दूर नेऊन थांबवा.
भूकंपानंतर काय करावे..
शांत रहा, रेडीओ, टिव्हीव्दारे मिळणाऱ्या सूचना काळजीपूर्वक ऐका व त्यांचे पालन करा, भूकंपानंतर अनेक अफवा उठतात उदा. जमिनीला भेगा पडल्या इ. खात्री शिवाय अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा पसरवू नका, भूकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर छोटे धक्के बसू शकतात, त्यामुळे पाणी विज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा. काडी ओढू नका, विजेचे बटन लगेचच चालू करु नका, कारण गॅस गळती अथवा शॉर्टसकट होण्याची शक्यता असते.
जर काही व्यक्ती जमिनीखाली दबल्या गेल्या असतील तर मदत तुकडीशी संपर्क साधावा, दुषीत वा उघडयावरचे पाणी पिणे टाळा, जेणेकरुन रोगांना प्रतिबंध होईल. भूकंपाच्या धक्क्यामुळे ज्या घरांना, इमारतींना फार मोठे तडे गेले आहेत त्या इमारतींचा राहण्यासाठी वापर करु नये. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे राजेंद्रकुमार पाटील यानी केले आहे.