३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच

संगमनेर Live
0
◻️ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

◻️ ३ हजार ६२८ पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता

संगमनेर Live (मुंबई) | तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ‍ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री विखे पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. 

आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३ हजार ११० साझे आणि ५१८ महसुली मंडळ कार्यालयासाठी ३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ७ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे महसुली विभागाअंतर्गत एकूण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसुली मंडळे आहेत. अमरावती महसुली विभागाअंतर्गत एकूण १०६ तलाठी साझे आणि १८ महसुली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसुली मंडळे आहेत. औरंगाबाद महसुली विभागाअंतर्गत एकूण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसुली मंडळे आहेत. नाशिक महसुली विभागाअंतर्गत एकूण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसुली मंडळे आहेत. कोकण महसुली विभागाअंतर्गत एकूण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसुली मंडळे आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !