◻️ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून गट ब अधिकाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी
संगमनेर Live (राहाता) | आयुष्यमान भारत योजना अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध समस्या १५ जानेवारीपर्यंत सोडवाव्यात अन्यथा या मागण्यांची पूर्तता न झाल्यास १६ जानेवारी रोजी एक दिवसांसाठी काम बंद आंदोलन व जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
अन्यथा येत्या २३ जानेवारी पासून आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी शासनकर्त्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन दिला आहे.अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या श्रद्धा जऱ्हाड - पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने म्हटले आहे की, आरोग्य विभागा अंतर्गत राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात जवळपास दहा हजार समुदाय आरोग्य अधिकारी गेल्या सहा वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत मात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्या बाबत शासनाने पुरेसे लक्ष न दिल्याने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पुरती परवड सुरू आहे. त्यामुळे शासनाप्रती समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मनात कमालीचा असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून गट ब अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. कामावर आधारित मोबदला रद्द करून सरसकट ६० हजार रुपये वेतन करावे. २३ इंडिकेटर रद्द करण्यात यावे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत निश्चित धोरण ठरविण्यात यावे पती - पत्नी एकत्रिकरण, दुर्धर आजार, मानसिक आजार, आई-वडील व परिवारातील बालकांच्या आजारांच्या बदल्यांमध्ये विचार करण्यात यावा.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना कामात बढती देण्यात यावी, हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्रांच्या यादीत शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्रांच्या अंतर्भाव करण्यात यावा,समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना टीए. डीए देण्यात यावा. या मागण्यांचा वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
येत्या १५ जानेवारीपर्यत मागण्यांची पूर्तता न झाल्यास १६ जानेवारी रोजी एक दिवसांसाठी काम बंद आंदोलन व जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर १७ जानेवारीपासून सर्व प्रकारचे ऑनलाइन कामे बंद करण्यात येणार आहेत.
त्यानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास २३ जानेवारी पासून राज्यभरातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने दिली. त्याबाबतचे लेखी निवेदन सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले असून याप्रकरणी शासन काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.