◻️ सोमनाथ बाळासाहेब जाधव या २८ वर्षीय तरुणाने जिद्द व ध्येयाच्या जोरावर यश केले संपादित
◻️ ग्रामस्थासह मान्यवराकडून सोमनाथ जाधवचे कौतुक
संगमनेर Live | शेती मधून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती तशी नाजूकच; मात्र तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील शेती व मेढंपाळाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील सोमनाथ बाळासाहेब जाधव या २८ वर्षीय तरुणाने जिद्द व ध्येयाच्या जोरावर सीए परीक्षेत यश संपादित केले आहे. त्याने मिळवलेल्या या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थाकडून कौतुक सुरु आहे.
शेतीसह मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबातील सोमनाथ याचे गावातीलचं जाधव वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. तर सरदार थोरात विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आश्वी खुर्द येथील महाविद्यालयामधून १२ वी वाणिज्य शाखेमधून ६५ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले होते.
सोमनाथच्या घरची परिस्थिती तशी बेताचीचं असल्याने पुणे येथे त्याने पार्ट टाईम काम करुन पुढील शिक्षण पुर्ण केले. याकाळात सोमनाथला अनेक अडचणीचा सामना करावा लागला असला तरी, मनात जिद्द होती. वडील बाळासाहेब जाधव हे मेंढपालन करत रिकाम्या वेळेत इतराच्या शेतात जावून बैलाच्या मदतीने नांगरणी, शेती मशागत करुन त्यांतील मिळणाऱ्या पैशातून घरखर्च करुन उर्वरीत मुलाला पैसे पाठवून उच्च शिक्षणासाठी मदत करत होते.
सोमनाथने सीएचे शिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया पूणे येथे पूर्ण केले. तर आर्टिकलशिप रामचंद्र विठ्ठल सागर यांच्याकडे पूर्ण केली. सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत या परीक्षेत त्याने अत्यंत घवघवीत यश मिळवले असून ग्रामीण भागातील, शेतकरी व मेंढपाळ कुटुंबातील असलेला सोमनाथन न्यूनगंड बाजूला ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने आणि जिद्दीने मिळविलेले यश इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून रामचंद्र विठ्ठल सागर व दिपक सूर्यभान जाधव या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य सोमनाथला मिळाल्याने सीए होणारा पानोडी या गावांचा पहिला विद्यार्थी ठरला आहे.
दरम्यान सोमनाथ जाधव यांच्या यशाबद्दल महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरानी अभिनंदन व कौतुक केले आहे.