◻️ पालकमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या जनतेला शुभेच्छां
संगमनेर Live (अहमदनगर) |. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जेष्ठ नागरीक आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, दंगल नियंत्रण पथक, वैद्यकीय पथक, अग्निशामक दलासह विविध चित्ररथांचा समावेश होता.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
रेसिडेन्सिअल हायस्कुल, चक्रधर स्वामी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केडगाव, रामकृष्ण इंग्लिश मेडीअम स्कुल व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल, अहमदनगर या शाळांमधील विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमास सर्व उपजल्हाधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, शाळेंचे शिक्षक, नागरिक यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण..
प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उप जिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, उप विभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.