◻️ गवत कापत असताना बिबट्याने केला महिलेवर हल्ला ; नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
◻️भटक्या कुत्र्याकडून मुलाला चावे ; धुळे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथील शकुंतला शंकर मैड या महिलेवर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केले असल्याची माहिती पत्रकार राजू नरवडे यानी कळवली. तर पत्रकार संजय गायकवाड यानी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या एका घटनेत आश्वी खुर्द येथे सोमवारी सायंकाळी ऊस तोड मंजुराच्या मुलाला भटक्या कुत्र्याने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. दरम्यान दोन्ही घटना दिवसा घडल्यामुळे संगमनेर तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पत्रकार राजू नरवडे यानी दिलेली माहिती अशी की, दरेवाडी शिवारातील लांडगदरा येथे शकुंतला शंकर मैड या राहात आहे. मंगळवारी त्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शकुंतला यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत. आरडा ओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यत बिबट्याने धूम ठोकली होती.
त्यानंतर शकुंतला मैड यांना औषधोपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान दिवसा ढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आश्वी खुर्द येथे कुत्र्याच्या हल्ल्यात ऊस तोड मंजुराचा चिमुकला गंभीर जखमी..
तर दुसऱ्या एका घटनेबाबत पत्रकार संजय गायकवाड यानी दिलेल्या माहितीनुसार उदरनिर्वाह करण्यासाठी तालुक्यातील कौठे-मलकापूर येथिल गजानन महाराज साखर कारखान्याच्या माध्यमातून आलेले ऊस तोड मंजूर हे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द - शिबलापूर रस्त्याच्या कडेला कोप्या करुन राहत आहेत. या टोळीतील मच्छिद्रं कुवर यांचा मुलगा अजय मच्छिद्रं कुवर (वय - १४) यांच्यावर कुत्र्याने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे.
याबाबत पत्रकार संजय गायकवाड यानी दिलेली अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील कुटुंब तालुक्यातील गजानन महाराज साखर कारखान्यावर ऊस तोडणी मंजूरीचे काम करण्यासाठी आले आहे. हे मंजुर आश्वी - शिबलापूर रस्त्याच्या कडेला कोप्या करुन राहत आहेत. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भटक्या कुत्र्याने ऊस तोडणी मंजूराचा मुलगा अजय कुवर यांच्यावर अचानक हल्ला करत चावे घेण्यास सुरवात केली.
त्यामुळे या मुलाने मोठ्याने आरडाओरड केल्यानतंर त्या ठिकाणी आलेल्या नागरीकानी त्या कुत्र्याला पिटाळून लावले. यानंतर त्या मुलाला घेऊन कुटुंबासह गावातील विकास भडकवाड हे आश्वी खुर्द आरोग्य केद्रांत आले होते. या मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर जखमा झाल्यामुळे या मुलावर प्राथमिक उपचार करत डॉक्टरांनी मुलाला नगर येथील रुग्णालयात हलवण्याच्या सुचना दिल्या होत्या.
दरम्यान तात्काळ नातेवाईक या मुलाला घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी निघाले होते. मात्र नगर जिल्ह्यात ओळखीचे कोणीही नसल्याने या मुलाला घेऊन कुटुंबाने थेट धुळे जिल्हा रुग्णालय गाठले असून त्याच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.