◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
◻️ राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता
संगमनेर Live (शिर्डी) | दुधाळ पशुधन वाटप योजनेच्या खरेदी किंमतीत सरकारकडून दुपट्टीने वाढ करण्यात आली असून याबाबतच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. या अनुषंगाने विविध योजनांमधील प्रति दुधाळ पशुधनाच्या खरेदी किंमतीत वाढ करून गायीसाठी ४० हजारावरून ७० हजार रुपये, तर म्हशीसाठी ४० हजारावरून ८० हजार रुपये एवढी खरेदी किंमत निश्चित करण्यात आली असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यभरात यांची अंमलबजावणी होऊन निश्चितच लाभार्थ्याच्या संख्येत वाढ होईल. शेतकऱ्यांना, दुध उत्पादकांना, सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसायाची संधी उपलब्ध होऊन राज्यात दूध उत्पादनास चालना मिळेल.
अशाप्रकारे नवीन वर्षात शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्याचे काम केले आहे, तसेच यापुढेही राज्यसरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ पशुधनाचे गट वाटप करण्याकरीता पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात योजना राबविण्यात येत आहेत. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी किंवा संकरीत गायी किंवा म्हैशींच्या गटाचे वाटप करण्यात येणार आहे.