◻️ सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी अर्ज मागवले
संगमनेर Live (अहमदनगर) | क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येते. या पुरस्कारांसाठी येत्या ३० जानेवारीपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शासनाने दि.१४ डिसेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. १६ ते ३० जानेवारी, २०२३ अशी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंक पहा. पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.