◻️ ‘शिंदेशाही बाणा' कार्यक्रमासाठी संगमनेरचे जानता राजा मैदान सजले
◻️ गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे व आदर्श शिंदे राहणार उपस्थित
संगमनेर Live | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा. महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा. जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेशाही बाणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.
संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जाणता राजा मैदानावर शिंदे शाही या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे या तयारीची पहानी इंद्रजीत थोरात, आर. एम. कातोरे, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, महेश जोंधळे, अभिजीत ढोले आदींसह विविध कार्यकर्त्यानी केली.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. नुकतेच खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील मुख्य समावेश म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळून संगमनेरच्या उत्कृष्ट नियोजनाचे देशपातळीवर कौतुक झाले आहे.
अशा या लोकप्रिय नेत्याचा वाढदिवस संपूर्ण राज्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा होत असून संगमनेर मध्येही ७ फेब्रुवारी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गतच रविवारी सायंकाळी ७.३० वा. जाणता राजा मैदान येथे शिंदेशाही बाणा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांची उपस्थिती राहून अनमोल गीतांचा नाजराणा हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू असून १०० बाय ५० चे भव्यदिव्य स्टेज, सुमारे दहा हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, पत्रकार कक्ष, व्हीआयपी कक्ष, पार्किंगसाठी व्यवस्था, एलईडी स्क्रीन, आकर्षक लाइटिंग यांसह सर्व सुविधा उभारल्या जात आहेत. या कार्यक्रमाला संगमनेर अकोल्या सह राज्यभरातील नागरिकांची मोठी गर्दी होणार असून याकरता वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजनही करण्यात आले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला संगमनेर, अकोले व जिल्ह्यातील नागरिक व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृत उद्योग समूह व नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळ यांनी केले आहे.