काँग्रेसच्या विचारातूनचं जनतेचा विकास - आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
◻️ लोकनेते आमदार थोरात यांचे संगमनेरात जंगी स्वागत

◻️ त्यांचे दहशतीचे राजकारण जिल्हा खपवून घेणार नाही

◻️ काही लोक राज्याचे मंत्री आहेत की तालुक्याचे? ते कळत नाही

◻️ पाचशे युवकांची बाईक रॅली व १ हजार किलोचा हार

संगमनेर Live | खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर संगमनेर मध्ये आलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मधील कार्यकर्त्यानी अभूतपूर्व जंगी स्वागत केले असून काँग्रेसचा विचार हाच सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा व आपला विचार असून हा विचार पुढे न्यायचा आहे. तसेच जिल्ह्यात विकास कामांना खीळ घालून जे दहशतीचे राजकारण सुरू आहे ते जिल्हा कधीही खपवून घेणार नाही, असे ना. विखे पाटील यांचे नाव न घेता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्यातील जनतेच्या वतीने झालेल्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, करण ससाने, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे, सौ. शरयूताई देशमुख, बाबासाहेब दिघे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर होती. ३८१ किलोमीटर झालेली ही पद यात्रा अत्यंत यशस्वी झाली. यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अत्यंत चांगल्या नियोजनाची देश पातळीवर चर्चा झाली. या नियोजनामध्ये सत्यजित तांबे यांनी मोठा सहभाग घेतला. पदवीधर निवडणुकीनंतर आपण वरिष्ठांना पक्ष मजबुतीसाठी पत्र लिहिली असून तो पक्ष पातळीवर निर्णय होईल. मात्र माध्यमांनी त्याला जास्त प्रसिद्धी दिली. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून याच विचारातून आपण पुढे जाणार आहोत.

सत्ता येते आणि जाते. इतक्या वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात आपण कधीही कुणाची वाईट केले नाही. ना. विखे पाटील यांचे नाव न घेता आ. थोरात म्हणाले की, काही लोक राज्याचे मंत्री आहेत की तालुक्याचे ते कळत नाही. त्यांचा राग फक्त संगमनेर तालुक्यावर आहे. संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील विकास कामे त्यांनी थांबवली आहेत. हे दहशतीचे राजकारण जिल्हा कधीही सहन करणार नाही. जनता कधीही त्यांच्या दहशतीचे राजकारणाचे झाकण उडवून देईल.

ऑक्टोबर २०२२ मध्येच निळवंडे धरणाचे पाणी आणायचे होते. मात्र या कामासाठी लागणारी खडी थांबवली असल्याने कालव्यांच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकास कामे बंद पडली आहेत. संगमनेर तालुका हा संघर्ष करणारा आहे. जिद्दीने लढणारा आहे. कितीही अडचणी आणल्या तरी संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार आहे.

सुसंस्कृत व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची संगमनेर तालुक्याच्या राजकारणाची परंपरा आहे. या संस्कृतीचा राज्यात सन्मान होतो. आहे. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यातील ५४ तालुक्यांमध्ये निर्माण केलेला जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध यामधून सत्यजित तांबे यांना मोठी मदत झाली असल्याने आ. डॉ. तांबे यांच्या कामाचा व संगमनेरच्या राजकारणाचा वारसा सत्यजित तांबे जोपासतील असेही ते म्हणाले.

सत्यजित तांबे म्हणाले की, पदवीधर निवडणुकीच्या वेळी आमदार थोरात व तांबे परिवाराला अडचणीत आणण्याचे डाव काहींनी रचले. मात्र हे सर्व डाव जनतेने उधाळून लावले आहे. या निवडणुकीत पक्ष पाठीशी नव्हता. आमदार थोरात यांची दुखापत असल्याने ते प्रचारक नव्हते अशा अडचणीतही सर्वपक्षीय जनतेने साथ दिली. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण संपून समाजकारण सुरू होते. ही संगमनेर तालुक्याची परंपरा आहे. आमदार डॉ.सुधिर तांबे यांनी निर्माण केलेला पाच जिल्ह्यांमध्ये मोठा ऋणानुबंध व आ. थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपण यापुढे जपणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार लहू कानडे म्हणाले की, विधानमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले आमदार थोरात यांची अधिवेशनात सर्वात जास्त उपस्थिती असते. मागील महिन्यामध्ये काही वावटाळी निर्माण झाल्या. मात्र आमदार थोरात यांचे नेतृत्व हे सर्व मान्य असून महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. राज्यातील डबल इंजिन सरकारने देशातील नागरिकांचे तोंड काळे केले असल्याची टीकाही त्यांनी केली. याप्रसंगी आ. डॉ. तांबे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर विश्वासराव मुर्तडक यांनी आभार मानले.

पाचशे युवकांची बाईक रॅली व १ हजार किलोचा हार..

आमदार बाळासाहेब थोरात यांचे शहरात आगमन होताच संगमनेर तालुक्यातील ५०० युवकांनी मोटरसायकल रॅली काढून आमदार थोरात यांचे जंगी स्वागत केले. ठिक ठिकाणी स्वागताचे मोठ मोठे होर्डिंग लागले होते. यावेळी यशोधन कार्यालयासमोर १ हजार किलोचा भव्य हार घालून पुष्प्वृष्टी करत आमदार बाळासाहेब थोरात यांचा संत्कार करण्यात आला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !