पत्रकार संघाच्या वतीने पुनम खेमनरचा संत्कार करताना जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे व योगेश रातडीया समवेत पुनमचे कुटुंबिय
◻️ अष्टपैलू पुनम खेमनरची राॅयल चॅलेंजर्स बंगळुर संघात निवड
◻️ ग्रामस्थांकडून पुनमचा संत्कार ; आश्वी सह तालुक्यात आनंदोत्सव
संगमनेर Live | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पहिल्यावहिल्या महिला प्रीमियम लीग म्हणजे ‘डब्ल्यूपीएल’ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघात संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी पुनम खेमनर हिची निवड झाली असून ही आनंदाची बातमी पंचक्रोशीत समजताच पुनमवर अभिनंदनाचा वर्षाव करण्याबरोबरचं नुकताच ग्रामस्थानी तिचा संत्कार केला आहे.
आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना ही त्यावर मात करत जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर महिला प्रीमियर लीगच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुर संघात तिची निवड झाली ही राज्याच्या व आश्वी ग्रामस्थासाठी गौरवास्पद बाब आसल्याचे गौरवोद्गार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी काढत पुनमचे कौतुक केले आहे. यावेळी आपण सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी इच्छुक असल्याच्या भावना पुनम खेमनर यानी व्यक्त केल्या आहेत.
भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या महिला प्रीमियर लींगसाठी राॅयल चॅलेंजर्स बंगळुर संघाने आश्वी बुद्रुक गावची कन्या पुनम नानासाहेब खेमनर हिचा संघात समावेश केला आहे. तिच्या निवडीनंतर आश्वी व परिसरातील गावांनमध्ये जल्लोष करत सोशल मिडीया वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. पुनम खेमनर व तिचे सहकारी सोमवारी रात्री उशिरा शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आश्वी बुद्रुक येथे दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी आश्वी बुद्रुक येथे फटाक्याची आताषबाजी व ढोल ताशाचा गजरात पुनमचे ग्रामस्थानी स्वागत केले.
यावेळी आश्वी व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, जैन श्रावक संघ, आश्वी बुद्रुक चालक मालक संघटना, आश्वी बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य स्वागत व संत्काराचे आयोजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका अँड. रोहीणीताई किशोर निघुते, माजी सरपंच बाळकृष्ण होडगर, प्रवरा बॅकेचे अध्यक्ष अशोक म्हसे, पोलीस निरीक्षक सुभाष भोये, पत्रकार सिताराम चांडे, विनायक बालोटे, सुमतीलाल गांधी, ईश्वर भंडारी, संजय गांधी, वसंत गांधी, हर्षल खेमनर, गंगाधर आंधळे, एकनाथ ताजणे, मिलिंद बोरा, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार रविंद्र बालोटे, पत्रकार अनिल शेळके सह ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पुनम खेमनर रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र संघाकडून पाच वर्ष तसेच नागालॅड संघाकडून दोन वर्षांपासून खेळत होती. याप्रसंगी तिची आई सुवर्णा, वडील नानासाहेब खेमनर, कोच अविनाश शिंदे, सनातन विनोद, बाबुसकलम, नागालॅड संघाची खेळाडु गौतमी नाईक यांचा ग्रामस्थांच्या वतीने संत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी पुनम खेमनर हिचे अनेक मान्यवरांनी गौरव केला. तिचे कौतुक करत असतांना अँड. रोहीणीताई निघुते, अभिनेत्री नित्यश्री नागरे यांना आनंद आश्रु लपवता आले नाही. पत्रकार सिताराम चांडे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून तिला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश रातडीया, प्रितम गांधी, सनी भंडारी, बबन खेमनर, संदीप खेमनर, पपलेश लाहोटी आदिनी परीश्रम घेतले.