◻️ सामान्य माणसाला कमी दरात वाळू उपलब्ध होणार
◻️ जिल्हाधिकारी यांना वाळू उपलब्धतेबाबत सूचना
संगमनेर LIVE (मुंबई) | सामान्य माणसाला दिलासा मिळेल आणि कमी दरात वाळू उपलब्ध होईल, असे सर्वसमावेशक धोरण तयार करुन लवकरच महसूल विभागामार्फत जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
नरपड (ता. डहाणू, जि. पालघर) येथील समुद्रकिनाऱ्यावरुन अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री अस्लम शेख, नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी प्रश्न मांडला होता.
महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले, वाळूचे दर याबरोबरच वाहतूक आणि अवैध वाहतूक याबाबतच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन वाळू उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण राहण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे. सद्या काही जिल्ह्यात शासकीय कामकाजासाठी आणि घरकुल योजनेसाठी वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना वाळू उपलब्धतेबाबत सूचना देण्यात येतील.
डहाणू तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूकीला आळा घालण्यासाठी ग्रामदक्षता समिती महसूल अधिकारी व कर्मचारी यांची पथके तसेच परिवहन व पोलीस यांच्या संयुक्त पथकामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहेत. सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ३४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.