अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास मोदी सरकार का घाबरते? - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0

◻️ मोदी सरकार जास्त काळ सत्तेवर राहणे लोकशाहीला घातक - नाना पटोले

◻️ जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला  - अशोक चव्हाण

◻️ अदानी महाघोटाळ्याप्रश्नी काँग्रेसचा राजभवनवर धडक मोर्चा

◻️ ‘मोदी-अदानी भाई भाई, देश बेचके खाई मलाई’च्या घोषणांनी गिरगाव चौपाटी दणाणली

संगमनेर LIVE (मुंबई) | अदानी महाघोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने देशभरातील राजभवनावर मोर्चा काढला आहे. अदानी स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीतील पैसा लुटत होता त्यावेळी चौकीदार काय करत होता? हाच प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केला तर तो भागच सरकारने कामकाजातून काढून टाकला. मोदी सरकार जास्त काळ सत्तेवर राहिले तर देशातील लोकशाही संपुष्टात येईन म्हणून मोदी सरकार बरखास्त करा, अशी मागणी करत आहोत,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अदानी समूहातील महाघोटाळ्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते राजभवन मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी खासदार संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, मुंबई युवक काँग्रेस अद्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, अदानी घोटाळ्यामुळे एसबीआय व एलआयसीतील जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेचा आवाज राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पोहचवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुणांचे प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. 

मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत आहे, त्यांना जेलमध्ये टाकत आहे. जे लोक घाबरून भाजपात गेले त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. मोदी सरकार जास्त काळ सत्तेतवर राहिले तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशातील लोकशाही, संविधान वाचेल की नाही अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. नाशिकमधून मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. शेतकऱ्यांकडे भाजपा सरकारचे लक्ष नाही, कांद्याला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, महागाई वाढली आहे, गॅस सिलेंडर ११५० रुपये झाला, जनतेला जगणे कठीण झाले आहे. बजेटमध्ये आकड्यांचे फुलोरे, घोषणांचे फुलोरे आहेत. एसबीआय, एलआयसीमधील पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली पण मोदी सरकार त्यावर गप्प आहे. मोदी सरकार अदानी घोटाळ्याची चौकशीच करत नाही.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, स्टेट बँक व एलआयसीतील जनतेचा पैसा अदानीच्या कंपनीत गुंतवण्यात आला पण आता तो धोक्यात आला आहे. अदानीच्या घोटाळ्याविरोधात देशात सर्वात प्रथम खा. राहुलजी गांधी यांनी आवाज उठवला. पण मोदी सरकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांना संसदेत बोलू देत नाही.आम्ही देशातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे आहोत म्हणून जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.

दरम्यान यावेळी ‘मोदी-अदानी भाई भाई, देश बेचके खाई मलाई’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !