मविआ सरकार काळातच पाणीपुरवठा योजनांसाठी ७८२ कोटींचा निधी - माजी मंत्री आ. थोरात

संगमनेर Live
0
◻️ निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपणच केली.

◻️ विकास कामात अडथळे आणणाऱ्या या खबऱ्यांचा बंदोबस्त जनता करेल

◻️ जिल्ह्यातील सध्याच्या दहशतीच्या राजकारणाला आपण पुरुण उरू

संगमनेर LIVE | महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कालव्यासाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरू ठेवले. डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे ऑक्टोबर २०२२ पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले. ही कामे आपणच केली आहे, मात्र सत्ता बदलामुळे काही दुसरे पाहुणे येतील. परंतु कामे कोणी केली जनतेला सगळे माहित आहे. तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ७८२ कोटी रुपयांचा निधी मिळवला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे हे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, विष्णुपंत रहाटळ, संतोष हासे, सौ. अर्चनाताई बालोडे, संतोष मांडेकर, विलास कवडे, एमआयडीसीचे चेअरमन भाऊसाहेब एरंडे, किरण नवले, सरपंच सौ. प्रगती बोराडे, रमेश गुंजाळ, शंकर राहणे, सुभाष गडाख, विजय राहणे, माधवराव वाळे, दिनकर एरंडे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा या गावांच्या पाणीपुरवठा योजने करता ५९ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. याचबरोबर निमगावजाळी, कोल्हेवाडी, तळेगाव, निमोण, निमगाव, घुलेवाडी या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ७८२ कोटी रुपयांचा मोठा निधी मिळवला. यातून या परिसरातील गावांच्या पुढील २५ वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे.

महाविकास आघाडी सरकार मधून सातत्याने निधी मिळवला. विकास कामे केली. हा निधी मागील सरकारच्या काळातील आहे. सध्याचे पालकमंत्री मात्र मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते हे सर्व जनतेला माहिती आहे.

तालुक्यातील सर्व सहकारी संस्था उत्तम रीतीने सुरू आहेत मात्र या चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्यासाठी काही लोक उपद्रव निर्माण करत आहेत. जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढून त्यांना पुरून उरू असे सांगताना

देश व राज्यपातळीवर राजकारणाची अवस्था वाईट झाली असून खा. राहुल गांधी यांनी २० हजार कोटींच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला अद्याप पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. उलट तातडीने खासदारकी रद्द केली आहे.

राज्यातील सरकार कोर्टाच्या निर्णयानंतर एका मिनिटात पायउतार होईल. धार्मिक तेढ निर्माण करून केले जाणारे राजकारण हे पुरोगामी व मानवतेचा विचार असलेल्या महाराष्ट्राला मान्य नसल्याचे ही त्यांनी सांगितले.

दरम्यान यावेळी मिलिंद कानवडे यानी मनोगत व्यक्तं केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब एरंडे यांनी केले तर किरण नवले यांनी आभार मानले.

खबऱ्यांचा बंदोबस्त जनता करेल

संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खोट्या - नाट्या केसेस दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. विकास कामात अडथळे आणणाऱ्या या खबऱ्यांचा बंदोबस्त जनताच करेल असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !