◻️ आश्वी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE | आपली भूमी त्याग व बलिदानाची भूमी आहे. या भूमीत अनेक रत्नांनी जन्म घेतला त्या सर्वच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन आपला उत्कर्ष साधायला हवा. स्वतासाठी जगता जगता आपल्याला इतरांसाठी सुद्धा जगता आले पाहिजे. आपल्यामुळे इतरांना आनंद मिळाला पाहिजे ही भावना आपल्या हृदयात असली पाहिजे. शिवकालापासून आपण भव्यता व शौर्य घ्यावे. शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा गडकिल्याची स्वच्छता करून साजरी करावी असे प्रतिपादन शिवशंभू व्याख्याते शिवचरित्रकार शुभम चौहाण यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना शिवचरित्रकार शुभम चौहाण बोलत होते. यावेळी महाविद्यालयात उमंग महोत्सवा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धा, वत्कृत्व, कविसंमेलन, फूड मॉल, शेलापागोटे याचबरोबर विविध गुणदर्शन आणि वार्षिक पारितोषिक वितरणव माजी विद्यार्थी मेळावा यांचा यामध्ये समावेश होता.
पुढे बोलताना शुभम चौहाण म्हणाले की, व्यवस्थापन आणि नियोजन शिवरायांकडून शिकावे शिवकाल ही जगण्याची नव्हे तर मारण्याची स्पर्धा होती. त्यागाची प्राणाची बाजी लावण्याचे गुण घ्यावे ते शिवकालातून आपले आईवडील व गुरुजन यांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती असल्याचे सांगितले.
वार्षिक पारितोषिक वितरणच्या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी रामभाऊ भुसाळ, बाळासाहेब मांढरे, भाऊसाहेब जऱ्हाड, प्रा. सयराम शेळके, महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, प्रा. देविदास दाभाडे, डॉ. सुवर्णा जाधव, उमंग महोत्सव समन्वयक प्रा. सुनंदा पाचोरे, विद्यापीठ प्रतिनिधी कु. साक्षी कुलथे तसेच विद्यार्थी संसद सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा, अविष्कार प्रोजेक्ट, आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धा, एन.सी.सी , एन. एस.एस. विविध कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रमात विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयात ज्ञानदान करणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव देखील यावेळी करण्यात आला.
यामध्ये विद्यावाचस्पती मार्गदर्शक म्हणून निवड झालेल्या प्राध्यापकांचा, विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करण्याऱ्या प्राध्यापकांचा तसेच उत्कृष्ट अध्यापन कार्याबद्दल प्राध्यापकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कलांचा अविष्कार असलेले वात्सल्यसिंधू या नियतकालिकाचे तसेच मराठी विभागामार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या माय मराठी या हस्तलिखिताचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राम पवार यांनी केले. महाविद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल प्रा. सुनंदा पाचोरे यांनी सादर केला. सूत्रसंचालन प्रा. देविदास दाभाडे, प्रा. प्राजक्ता खळदकर, प्रा. अश्विनी आहेर यांनी केले तर आभार कु. साक्षी कुलथे हिने मानले.