पीसीपीएनडीटी कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा

संगमनेर Live
0
◻️ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश

◻️ गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्र तसेच रुग्णालयांवर होणार कडक कारवाई

◻️ बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षिस

संगमनेर LIVE (अहमदनगर) | जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्र तसेच रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विषयक विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप इंगळे, डॉ. फुंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात केंद्रांची अचानकपणे तपासणी करुन दोषी आढळणाऱ्या केंद्रावर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरीकांनी याकामी सक्रिय होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये लिंगगुणोत्तराचे प्रमाण हे जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असुन आरोग्य विभागाने याबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.

बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास शासनाने एक लक्ष रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या योजनेची गावपातळीपर्यंत प्रसिद्धी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

एड्स या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी सातत्याने सामाजिक शिक्षणाची मोहिम अधिक व्यापक करुन त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील एडस बाधित रुग्णांची नोंद अद्यावत ठेवण्याबरोबरच शासकीय यंत्रणेमार्फत उपचार घेणारे व खासगी दवाखान्यातुन उपचार घेणाऱ्या रुग्णांची नियमितपणे तपासणी, त्यांना योग्य प्रकारे औषधोपचार मिळत आहेत  याबाबत दैनंदिन पाठपुरावा करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

कोव्हीडच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने दक्षता घेत नागरिकांच्या तपासण्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे जिनोमिक सिक्वेन्सचे सँपल घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात यावेत. जिल्हा व तालुका रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावी. मुबलक प्रमाणात औषधीसाठा राहील, याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी आवश्यकती काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, रुग्ण कल्याण समिती यासह जिल्हा रुग्णालय अंतर्गत समित्याच्या कामाचाही सविस्तरपणे आढावा घेतला.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !