◻️पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांना हा कार्यक्रम ऐकता यावा यासाठी कुंदन लॉन्समध्ये नियोजन
संगमनेर LIVE (शिर्डी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा कार्यक्रम ऐकण्यासाठी राहाता तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांना हा कार्यक्रम सामुहीकपणे ऐकता यावा यासाठी शहरातील कुंदन लॉन्समध्ये नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महीन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमातून विविध संकल्पना, विकासात्मक बाबी आणि विविध क्षेत्रात वेगवळेपण निर्माण केलेल्या व्यक्तिंची उदाहरणं देवून जनतेशी संवाद साधत असतात. यंदाचा हा शंभरावा भाग असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात आणि राज्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघाचा मुख्य कार्यक्रम महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांना यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. मतदार संघातील विविध गावांमध्ये सुध्दा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.