◻️ आत्मनिर्भर भारतासाठी पुढे येण्याचे ना. विखे पाटील यांचे आवाहन
संगमनेर LIVE (लोणी) | कामगारांनी कष्टाचा काळ हा साखर कारखान्यासाठी दिल्याने आज आपले कार्यक्षेत्र हे कमी असतांना देखिल सहकारात आपण चांगले काम करू शकलो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या इथेलॉन धोरणामुळे साखर कारखानदारीस चालना मिळाली असे सांगत सहकारांच्या गप्पा मारणारे आज खाजगी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवत आहे पण पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या विचारावर सुरु असलेल्या वाटचालीमुळे आपल्या सर्वच संस्था प्रगती पथावर आहेत यामध्ये कामगारांसह सर्वाचे योगदान महत्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन महसूल मंत्री आणि पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्षा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि साखर कामगार सभा यांच्यावतीने आयोजित कामगारांच्या सेवा पुर्ती कार्यक्रमात ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, माजी उपाध्यक्ष कैलास तांबे, कामगार संचालक पोपट वाणी, दिलीप कडु, संचालक देवीचंद तांबे, सुभाष अंत्रे, सतीष ससाणे, दादासाहेब घोगरे कारखान्याचे सल्लागार वेल्सन जिमी कार्यकारी संचालक अभिजित भागडे आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात ना. विखे पाटील म्हणाले, पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अर्थतज्ञ डॉ. धनंजय गाडगीळ आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारावर आपली वाटचाल सुरु आहे. जिल्हात सर्वात कमी कार्यक्षेत्र विखे पाटील कारखान्याचे असतांनाही आपल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. यामध्ये आपले योगदान आणि त्याग महत्व पूर्ण आहे.
आज साखर कारखानदारी पुढे अनेक आव्हाने आहेत. त्यांचा ही सामना करत पुढे जातांना कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढविणे, खाजगी कारखन्याशी स्पर्धा, नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई यांवर मात करत पुढे जावे लागणार असल्याचे सांगून सहकारी चळवळीला केंद्र सरकारचं पाठबळ मिळत आहे. नवे तंत्रज्ञान अवगत करतांना शेतीच्या पाण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या अमृत कलश योजनेतून एकरी उस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे.
महसूल मंत्री म्हणून काम करतांना वाळू माफीयांची दशहत आता संपली आहे. १ मे पासून नायगांव डेपोतून केवळ सहाशे रुपये प्रति ब्रासने वाळू उपलब्ध होणार आहे असे सांगून महसूल मंत्री म्हणून सुरू केलेल्या कामामुळे अनेकांचे धंदे बंद पडल्याने आपल्या शेजाऱ्यांना त्रास होत आहे. त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल.
शेवटी तरुण पिढीसाठी हे सरकार काम करत आहे. असे सांगून आपण आता सेवानिवृत्त होत आहातं आपल्या अनुभवाचा उपयोग शेतीमध्ये करा, गावात उद्योग निर्मीती करा, व्यसनांपासून दूर राहून अध्यात्मिक कार्य आणि वाचन याव्दारे निरोगी आयुष्य जगा अशा शुभेच्छा ही निवृत्त कामगारांना दिल्या.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव आहेर तर आभार उपाध्याय विश्वासराव कडू यांनी मानले.
शिर्डी येथे सरकार लवकरचं आयटी पार्क करून तरुणांना रोजगार निर्माण करुन देणार आहे. आपणही आपल्या अनुभवातून गांवात रोजगार निर्मीतीसाठी प्रयत्न करा. यासाठी आपणांस अर्थ सहाय्य करु. आत्मनिर्भर भारतासाठी पुढे या असे ना. विखे पाटील म्हणाले.