◻️ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन
◻️ पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक
◻️ फरार, तडीपार तसेच समाज कंटकावर पोलीसाना कठोर कारवाईच्या सुचना
संगमनेर LIVE (अहमदनगर) | जिल्ह्याला धार्मिकतेची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत जिल्ह्यात होणारे सण, उत्सव शांततेत साजरे व्हावेत, जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हावासीयांनी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे. तसेच समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, समाजामध्ये शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच समाजातील प्रत्येक नागरिकाची आहे. समाजातील शांतता कायम राखण्यासाठी प्रशासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे आपली भूमिका बजवावी. तसेच प्रत्येक नागरिकाने प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी यावेळी केले.
सार्वजनिकरित्या सण उत्सव साजरे करताना वर्गणी जमा करण्यात येते. वर्गणी जमा करण्यावरून अनेकवेळा वाद निर्माण होऊन समाजामध्ये अशांतता निर्माण होण्याचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यासाठी अंतर्गतरीत्या वर्गणी जमा केल्यास हे वाद होणार नाहीत. तसेच वर्गणी जमा करण्याची प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यासह आवश्यक पदाधिकाऱ्यांना एकत्र करून यावर निर्णय घेण्याचा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
उत्सव साजरे करताना मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकामधून मोठ्या आवाजात डी. जे. वाजवणे, घोषणा देणे यासारख्या प्रकारातून वाद निर्माण होतात. हे वाद न होता उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी प्रशासनाने आचारसंहिता तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
समाजात तेढ निर्माण होऊन अशांतता पसरविण्यासाठी समाज माध्यमातून संदेश पसरविण्यात येतात. समाज माध्यमाचा गैरवापर करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सायबर गुन्हे कक्षाचे अधिक प्रमाणात बळकटीकरण करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
समाजातून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी फरार, तडीपार तसेच समाज कंटकावर पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी. अहमदनगर शहरातील प्रत्येक चौकात येत्या १५ दिवसांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. बंद असलेल्या पोलिस चौक्यांबरोबरच मोहल्ला समित्या कार्यान्वित कराव्यात. शहरात अथवा गावात अप्रिय घटना घडत असेल तर त्या घटनेची माहिती पोलिसांना वेळेत मिळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस विभागाला दिल्या.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, समाज कंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख भूमिका बजवावी. तसेच सायबर गुन्हे कक्ष अधिक बळकट करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
आमदार लहू कानडे म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम करतात. अशा व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर म्हणाले, जातीय व धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येक धर्माचा आदर राखणे आवश्यक असुन त्यातुनच समाजातील शांततेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे शक्य हाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसुन समाजात अशांतता पसरविण्याबरोबरच तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाईसाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, आपले राज्य हे शांतताप्रिय राज्य आहे. परंतू अलिकडच्या काळात काही प्रमाणात घडत असलेल्या अप्रिय घटनांचे प्रत्येकाने चिंतन करणे गरजेचे आहे. आगामी काळात जिल्ह्यात विविध सण, उत्सव तसेच निवडणुका या शांततेमध्ये पार पाडण्यासाठी समाजातील प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करावे. कायद्याचा भंग करणाऱ्याविरुद्ध प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित सदस्यांनीही जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी उपयुक्त अशा सुचना केल्या.
डिजिटल बोर्डचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन..
शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी याउद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उदघाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी उपस्थित होते.