संगमनेर LIVE | आयुष्यात नेहमी चांगले काम करा. गुरुमाऊली आपल्या सोबत कायम असते. गुरुमाऊली जगाची आई आहे ते निश्चित तुमचे कल्याण करेल मानसिक समाधान मिळविण्यासाठी स्वामीची सेवा करा. असे प्रतिपादन उत्तर जिल्हा स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख रावसाहेब शेजूळ यांनी केले.
राहाता तालुक्यातील दुर्गापुर येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र केंद्राचा पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भाविकाशी हितगुज साधतांना शेजुळ मामा बोलत होते यावेळी आ. ट्रक सोसायटीचे उपाध्यक्ष सुनिल जाधव, ह. भ. प. सोपान महाराज जाधव, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सोपानराव शिगोटे, डाॅ. जयश्री सिनगर, मंगलताई थोरात, डाॅ. राम तांबे, प्रकाश पुलाटे, डाॅ. रविद्र जाधव, प्रा. रमेश जाधव, मंगलताई थोरात संध्या रोकडे, प्रा. बापुसाहेब अनाप आदीसह परिसरांतील स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते.
यावेळी शेजुळ म्हणाले की, दुर्गापुराला सर्वांना आनंद देणारे गावातील आराध्य दैवत आनंद बाबा यांचा आशीर्वाद आहे तर दुर्गामातेचे अधिष्ठान असलेल्या दुर्गापुरला सर्व बाजूंनी सुजलम सुफलम केले आहे. महाराजांची कृपा नेहमीच या गावावर आहे याचा अनुभव सेवेकरी वर्गाला नेहमीच येतो आहे. गरज आहे ती तन-मन-धनाने गुरुमाऊलीशी एकत्र नाळ जोडणारी असून दुर्गापूर येथील सेवेकरी याबाबत कोठेही कमी पडणार नाही. हा विश्वास व्यक्त करत शेजूळ मामा यांनी चिंचपूर व दुर्गापुर केंद्राच्या इतिहास डोळ्यासमोर उभा केला दुर्गापुर केंद्राने चिकाटीने गुरुमाऊलीशी असलेला विश्वास यामुळे या केंद्राची पंचवीस वर्षात हिमालया एवढी प्रगती झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर बाल संस्कार केंद्राचे महत्त्व हे त्यांनी विशद केले. विवाह मंडळाची संकल्पना ही त्यांनी स्पष्ट केली आणि त्याची गरज का आहे याबाबत विवेचन केले.
केंद्रातील सेवेकरी मंगेश मनकर यांनी कार्यक्रमाची स्वागत करताना केंद्राचा पंचवीस वर्षाचा आढावा घेत पंचवीस वर्षाचा काळ म्हणजे अगदी कालपासून सुरू झालेला काळ आहे असा भास होतो. शून्यातून सुरू झालेली दुर्गापुर ची प्रगती आज आकाशाशी स्पर्धा करत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात चमकत आहे याचा मूळ पाया श्री स्वामी समर्थ सेवा हेच आहे असे त्यांनी सांगितले. यानंतर प्रकाश पुलाटे यांनी केंद्राची सुरुवात व त्यात झालेली स्थित्यंतरे, केंद्राचा झालेला विकास समाजातील सर्व स्तरातील लोकांनी घरचे काम म्हणून केंद्रासाठी दिलेले योगदान शब्दाच्या पलीकडे असल्याचे त्यांनी सांगितले. ह. भ. प. सोपान महाराजांनी आरती चे महत्व परमेश्वराची असलेला संबंधयाविषयी माहीती दिली.
दरम्यान प्रा. रमेश जाधव यांनी केंद्रात आलेल्या देणगीचा लेखाजोखा मांडला तसेच पुढील काळातील संकल्पना स्पष्ट केल्या. प्रा डॉ. राम तांबे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डाॅ. वंदना पुलाटे, डाॅ. सोमेश्वर मनकर, संकेत रोकडे, जय मल्हार कदम यांचा सन्मानही करण्यात आला.
मुलांच्या वाढदिवसाचा आनाठाई खर्च टाळून ती रक्कम केंद्राला देण्याचे आवाहन केले त्यातून गरीब मुलांसाठी शालेय खर्च करण्याचा संकल्प करण्याबरोबरचं पुस्तक बॅकेतून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.