◻️ आश्वी खुर्द येथे संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शाहिरी जलसा उत्सहात
◻️ पुरुष, महिलासह तरुणाची लक्षणीय उपस्थिती
संगमनेर LIVE | ‘भीम येणार येणार ग’ या पहाडी शाहिरीतून संभाजी भगत यांनी तब्बल दोन- अडीच तास आपल्या प्रबोधनपर शाहिरी गीतातून आश्वीकरांना खिळवून ठेवत महिलांच्या चळवळीतून भीमक्रांती साकारणार असल्याचे सांगितले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल तरुणानी एकत्र येऊन आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव महिनाभरापासून साजरा करत असून तथागत भगवान बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून दिनांक ३ मे रोजी लोकशाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भव्य स्टेज, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, लाईट व्यवस्था, व्ही. आय. पी. बैठक व्यवस्था, एल. ई. डी. लाइव्ह प्रक्षेपण व्यवस्था, १०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची शिस्त, महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, पार्किंग नियोजन व उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे आश्वी परिसराने न भुतोनभविष्यती असा डोळ्यांची पारणे फेडणारा जयंती सोहळा अनुभवला आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पेटत्या मशालीच्या ज्वाला व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार टाळ्यांच्या गजरात संभाजी भगत यांचे मंचावर आगमन झाले आणि त्यानंतर सुमारे अडीच तास आपल्या अनोख्या शैलीतून शाहीर संभाजी यांनी आश्वीकरांची मने जिंकली.
यावेळी संभाजी भगत यांच्या एकापेक्षा एक सरस अशा रचनांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ‘ये हिटलर के साथी, जनाजो के बाराती, पुछते नही इन्सान को कौन है तू, पुछते है धर्म और जाती’ अशा एका पेक्षा एक शाहिरी गीतांनी विषमता, जातीभेद यावर आसूड ओढले. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचेवरील गीतांनी उपस्थितानमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सात उच्चशिक्षित डॉक्टर, सहा प्राध्यापक, चार कृषी पदवीधर, दहा शिक्षक, चार अभियंते, दोन वकील, एकवीस विद्यार्थी, पंचेचाळीस शेतकरी, दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, सहा कारागीर, महिला व मुली यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे, सचिव राजेंद्र मुन्तोडे व समन्वयक अनिल मुन्तोडे यांनी दिली आहे.