◻️ भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव
◻️ शिव - फुले - शाहु - आंबेडकर चळवळीतील हल्लाबोल गाण्यांचे वादळ संध्याकाळी धडकणार
◻️ थेट आँस्करला धडकलेल्या विद्रोही शाहिरी जलसाच्या माध्यमातून प्रबोधनाची मेजवानी
◻️१०० पेक्षाही जास्त उच्चशिक्षित स्वयसेवकाकडून कार्यक्रमाची जयत तयारी
संगमनेर LIVE | लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे, सचिव प्रा. राजेद्रं मुन्तोडे व प्रा. अनिल मुन्तोडे यानी नुकतीचं पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी समितीने म्हटले आहे की, आज देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली असून शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत गंभीर होत असून सर्वच वर्गसमुहतील लोकांच्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. अशा परिस्थितीत मिळालेल्या संविधानिक हक्क अधिकारांची पायमल्ली होत असताना समाज प्रबोधन करणे व आपल्या हक्क अधिकारांचे जतन करण्यासाठी लढा देणे ही बुध्दीजीवी वर्गातील लोकांची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी बनली आहे.
त्यानुषंगाने संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून मागील एका दशकापूर्वी व्यापक प्रबोधन चळवळ हाती घेतल्याची माहिती देऊन मागील काही वर्षांपासून मोफत अभ्यासिका, कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्सला अत्यावश्यक किट पुरवठा करणे यासारखे उपक्रम राबविले असल्याचे सांगितले. तसेच १४ एप्रिल २०२२ पासुन १० मे पर्यंत २०२२ संविधान जागृती साठी सम्यक धम्म रथ यात्रा आयोजित करुन सुमारे ३२ प्रबोधन सभा आयोजित करून यशस्वी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी समितीचे सदंस्य पुढे म्हणाले की, समाज प्रबोधनाचा सुयोग्य परिणाम साधला जावा यासाठी संयुक्त जयंती महोत्सव समितीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “माझ्या दहा सभा जो परिणाम करू शकत नाही; तो परिणाम शाहिरांचं एक गीत करू शकते" ! या विचाराला आधार बनवून सर्व स्तरातील समाज बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान आश्वीसह संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शाहिरी जलसा कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले असून कार्यक्रमाची सर्व तयारी पुर्ण झाली असून १०० पेक्षाही जास्त उच्चशिक्षित स्वयसेवक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती यावेळी समितीने दिली आहे.