निळवंडे कालव्‍यातून पाणी येण्‍याचा आनंद हा सण उत्‍सवापेक्षाही मोठा - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ गोगलगाव आणि आडगाव या लाभक्षेत्रातील गावांमधून निळवंडे कालव्‍याचे पाणी मार्गस्‍थ

◻️ ७ दिवसात ८५ कि. मी चा प्रवास करुन पाणी राहाता तालुक्यात दाखल

संगमनेर LIVE (राहाता) | निळवंडे कालव्‍यातून पाणी येण्‍याचा आनंद हा एखाद्या सण उत्‍सवापेक्षाही मोठा आहे. अनेक वर्षांची या भागातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. या विषयावर आरोप-प्रत्‍यारोप आणि टिका टिपण्‍णी करण्‍यापेक्षा सर्वांचे स्‍वप्‍न पुर्ण होत असल्‍याचे समाधान सर्वांनी मानले पाहीजे अशी भावना महसुल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

जीरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण डाव्‍या कालव्‍यातून सोडण्‍यात आलेले पाणी तालुक्‍यातील गोगलगाव आणि आडगाव या लाभक्षेत्रातील गावांमधून मार्गस्‍थ झाले. या दोन्‍हीही गावातील ग्रामस्‍थांनी जल्‍लोषात पाण्‍याची विधीवत पुजा करुन, आपला आनंद साजरा केला. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंह पाटील, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा बॅकेचे उपाध्‍यक्ष मच्छिंद्र थेटे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक, अभि‍यंता कैलास ठाकरे, विवेक लव्‍हाट यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रामस्‍थांसह मंत्री विखे पाटील यांनी कालव्‍यामध्‍ये उतरुन पाण्‍याचे पुजन केले. फटाक्‍यांची आतशबाजी करीत युवकांनी आपला आनंदोत्‍सव साजरा केला. महिलांनी अतिशय उत्‍साहाने पाण्‍याचे पुजन आणि औक्षण करुन या क्षणाचा आनंद व्दिगुणीत केला. ३१ मे रोजी निळवंडे धरणातून डाव्‍या कालव्‍यात पाणी सोडून प्रथम चाचणी करण्‍यात आली. अवघ्‍या ७ दिवसात ८५ कि. मी चा प्रवास करुन हे पाणी आता कालव्‍याच्‍या माध्‍यमातून पुढे जात आहे. प्रथम चाचणी यशस्‍वी केल्‍याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी सर्व अभियंत्‍यांचे अभिनंदन करुन त्‍यांचा सत्‍कार केला.

महाराष्‍ट्राच्‍या इतिहासात हा पहिला प्रकल्‍प असा आहे की, ज्‍या  प्रकल्‍पाची चाचणी अवघ्‍या ७ दिवसात यशस्‍वी झाली आहे. सध्‍या या कालव्‍यातून ३०० क्‍युसेसने पाणी सोडण्‍यात आले आहे. भविष्‍यात या कालव्‍यातून ९०० क्‍युसेसने पाणी वाहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन मंत्री विखे पाटील म्‍हणले की, आजचा दिवस हा जिरायती पट्ट्याच्‍या दृष्‍टीने ऐतिहासिक ठरला आहे. गेली अनेक वर्षे या पाण्‍याची प्रतिक्षा सर्वांना होती. ते स्‍वप्‍न आता पुर्ण झाले असल्‍याचे समाधान वाटते.

लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पासून या धरणाच्‍या  निर्मितीला प्रारंभ झाला. मात्र त्‍यानंतर अनेक कारणांनी या प्रकल्‍पाचे काम रखडले. मात्र राज्‍यात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सरकार असताना ख-याअर्थाने या कालव्‍यांच्‍या कामांना चालना मिळाली. यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेही सहकार्य मिळाले. आता पुन्‍हा राज्‍यात युतीचेच सरकार असल्‍याने या कामातील सर्व अडथळे दुर झाल्‍याने या प्रकल्‍पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या हस्‍ते होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

या प्रकल्‍पाच्‍या कामासाठी सर्वांचेच सहकार्य मिळाले. कुठेही श्रेयवादाची लढाई नाही, आमच्‍यावर जाणीवपुर्वक आरोप करणा-यांना आता पाणी आल्‍यामुळे उत्‍तर मिळाले आहे. त्‍यामुळे किंतू परंतू मनात न ठेवता खुल्‍या दिलाने या ऐतिहासिक क्षणाचे समाधान सर्वांनीच व्‍यक्‍त करण्‍याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील म्‍हणाले की, गेली अनेक वर्षे या रखडलेल्‍या प्रकल्‍पाचे काम आता मार्गी लागल्‍याने सर्वांच्‍या आशा आकांक्षा पुर्ण झाल्या आहेत. राज्‍यातील युती सरकारने या प्रकल्‍पासाठी मोठे सहकार्य केले त्‍याबद्दल त्‍यांनी मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे अभिनंदन करुन आभार मानले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !