◻️ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा मा. कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम शंभर टक्के बँकेची वसुली दिली आहे. शून्य टक्के व्याज देण्याच्या जिल्हा बँकेच्या निर्णयातून संगमनेर तालुक्यातील नियमित फेड करणाऱ्या ४५०१९ सभासदांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ७ कोटी ७२ लाख २१ हजार ७४९ रूपये व्याज सवलत मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ॲड. कानवडे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे व तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आदर्श परंपरा लाभलेल्या संगमनेर तालुक्याने जिल्हा बँकेची कायम शंभर टक्के वसुली दिली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ७ कोटी ७२ लाख २१ हजार ७४९ रुपये सवलत मिळाली आहे.
सन २०२०-२१ वर्षात २१ हजार २४२ सभासदांना ३ कोटी १३ लाख रुपये, तर सन २०२१-२२ मध्ये २३ हजार २७६ सभासदांना ४ कोटी ५२ लाख ९२ हजार ४२५ रुपये व्याज सवलत मिळाली आहे. तर विशेष घटक योजनेअंतर्गत २०२०-२१ मध्ये ५०१ सभासदांना ६ लाख ६८ हजार रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे .अशी तालुक्यात २०२०-२१ व २०२१-२२ मिळून ४५०१९ सभासदांना ७ कोटी ७२ लाख २१ हजार ७४९ रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे.
यासाठी काँग्रेस नेते व माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
याकरता जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, वसुली अधिकारी उल्हास शिंदे, सचिव संघटनेचे प्रकाश कडलग आदींनी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. या कामी सर्व शाखा अधिकारी व सोसायट्यांचे सेक्रेटरी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व शेतकी संघ यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
दरम्यान ही व्याज सवलत मिळाल्यामुळे तालुक्यातील नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या शेतकऱ्यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.