कोल्हे साहेबांचा वारसा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात - विवेक कोल्हे

संगमनेर Live
0
◻️ थोरात - कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक - करण ससाने

◻️ तुम्हाला गाळप करता आले नाही म्हणून संगमनेर संजीवनी शेतकऱ्यांच्या मदतीला आले - सचिन गुजर

संगमनेर LIVE (राहाता) | ‘सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांचे गणेश कारखान्यावर आणि गणेश परिसरावर विशेष प्रेम होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याने सुवर्णकाळ अनुभवलेला आहे, कोल्हे साहेबांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे‘, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोंडेगाव येथे प्रचार बैठक घेतली. बैठकीत बोलताना त्यांनी या निवडणुकी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, सचिन गुजर, गणेशचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजीराव लाहरे, सुरेश थोरात आदींसह बहुसंख्य सभासद, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, ‘अत्यंत संघर्षाच्या काळात कोल्हे साहेबांनी गणेश कारखाना चालवला. तब्बल ३८ वर्ष त्यांनी कारखान्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळे सभासद, शेतकरी आणि कामगारांमध्ये कोल्हे साहेबांबद्दल प्रचंड आदर आणि श्रद्धा आहे. कोल्हे साहेबांचा नातू म्हणून त्यांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे.‘ 

‘गणेश परिसरात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कोल्हे साहेबांनी ताकद दिली. त्या सर्वच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मला आग्रह धरला. त्यांचा आग्रह आम्ही मोडू शकलो नाही. बाळासाहेब थोरात यांच्या सोबत ही निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनीच मांडली. महाराष्ट्रात सहकारात कधीच राजकारण आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो, आम्ही गणेश सक्षमपणे चालवू, जितका संगमनेर आणि संजीवनी आमच्यासाठी महत्त्वाचा तितकाच गणेशही महत्त्वाचा असेल, अशी ग्वाही या बैठकांमधून विवेक कोल्हे यांनी सभासद आणि कामगारांना दिली.

करण ससाने म्हणाले, गणेश कारखान्याच्या चांगल्या भविष्यासाठी थोरात आणि कोल्हे ही ब्रॅण्डेड युती आहे, बाळासाहेब थोरात यांनी राज्याला आदर्श ठरतील अशा प्रकारे सहकारी संस्था चालवले आहेत. त्यांचे नेतृत्व संयमी, निष्कलंक आणि प्रामाणिक आहे. त्यांनी राजकारण करताना कायम सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. विवेक कोल्हे यांनी अत्यंत कमी वयात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे, त्यामुळे मेहनती आणि अभ्यासू नेतृत्व श्री गणेश परिवर्तन मंडळाला लाभलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेशचा भविष्यकाळ उज्वल असेल अशी मला खात्री आहे.

सचिन गुजर म्हणाले, प्रवरेच्या नेतृत्वाने ऊर्जित अवस्थेत असलेला गणेश कारखाना आठ वर्षात खिळखिळा केला. योग्य वेळेत आधुनिकीकरण केले नाही, डिस्टलरी बंद ठेवली. शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड मिळाली नाही. भाव कमी दिला, वेळेत शेतकऱ्यांचे देणे दिले नाही. राज्यात ऊस अधिक असताना गणेश कारखान्याला पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही. 

जर संगमनेर किंवा संजीवनीने ऊस नेला नसता तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस पेटवून द्यावा लागला असता. तुम्हाला कारखाना धड चालवता आला नाही, भाव देता आला नाही, म्हणून संगमनेर संजीवनीला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यावे लागले. प्रवरेच्या नेतृत्वाला गणेश चालवता येत नाही म्हणून पाणी असूनही शेतकऱ्यांनी ऊस लावणे बंद केले. 

प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश बंद करण्यासाठी सगळ्या उपाययोजना केल्या, हम करे सो कायदा हा त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठीच थोरात कोल्हे एकत्र आलेले आहेत. थोरात आणि कोल्हे हे दोघेही संस्था चांगल्या चालविण्यासाठी राज्यात ख्यातकीर्त आहेत, गणेश परिसरातील सभासद, कामगार, शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा माझा विश्वास आहे, असेही गुजर म्हणाले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !