◻️ आ. बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक कोल्हे या जोडगोळीची सोशल मिडिया ते गावच्या कट्ट्यावर जोरदार चर्चा
◻️ थेट गल्ली ते दिल्ली कथ्थाकुट रंगवला जात असला तरी प्रत्यक्षात वास्तव काय?
संगमनेर LIVE | गणेश साखर कारखान्याच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी उधळलेला गुलाल जमिनीवर खाली बसला असला, तरी चर्चेचा गुलाल अद्याप उधळला जातोच आहे. एकीकडे या निवडणुकीत ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक कोल्हे या जोडगोळीने कशी बाजी मारली, यावर सोशल कट्टा ते गावच्या कट्ट्यावर चर्चेच्या फेरी झडत आहेत. दुसरीकडे याच निवडणुकीत पराभूत झालेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भविष्यातील राजकारण कसे अडचणीत आले, यावर थेट गल्ली ते दिल्ली कथ्थाकुट रंगवला जात आहे; पण प्रत्यक्षात वास्तव काय? युद्ध असो, खेळ असो, किंवा निवडणुकीचे मैदान, जिंकणारा सिकंदर असतोच, हे मान्य; पण पराभवाला वाली नसतो, म्हणून हरणाऱ्याच्या पुन्हा लढण्याच्या वाटा संपतात, असेही नाही.
गणेशच्या निकालानंतर राजकारणाच्या वाऱ्याची दिशा समजून घ्यायची असेल, तर अलिकडच्या काळात अधिक टोकदार झालेल्या विखे- थोरात संघर्षात डोकावेच लागते. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर थोरातांचे महसूलमंत्री पद जाऊन शिंदे - फडणवीस सरकारमध्ये ते विखेंना मिळाले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करणे, सत्तेत आल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केले. याच भाजपाच्या स्ट्रॅटेजीनुसार मंत्री विखेंनीही थोरातांच्या मतदारसंघात लक्ष घातले.
यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात या राजकारणात विखेंना यशही मिळाले. विधानसभेला राहाता मतदारसंघात जोडलेल्या २६ पैकी २५ ग्रामपंचायतीवर विखे गटाने झेंडा फडकवला. संगमनेर तालुक्यातील गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांना दंड केला. यामुळे अस्वस्थ झालेल्या आमदार थोरातांनीही त्यांचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी विखेंच्या राहाता मतदारसंघात लक्ष घातले. त्यात गणेशची निवडणूक जाहीर झाली आणि विखेंविरुद्ध संघर्ष तीव्र करायला थोरातांना नामी संधी मिळाली. विखेंच्या मतदारसंघात थोरातांनी कोल्हेंच्या मदतीने कार्यकर्त्यांची मोट बांधली.
संगमनेरचा सहकारातील शिस्तीचा वसा आणि संजीवनी यशस्वी चालवून गणेशला केलेल्या मदतीचा वारसा, या दोन्ही गोष्टी मतदारांना भावल्या. म्हणून विखेंच्या होम पिचवर त्यांना मोठा धक्का देण्यात थोरात-कोल्हे यशस्वी झाले. या निकालामुळे युवा नेते विवेक कोल्हेंच्या उभरत्या राजकीय कारकीर्दीचा आश्वासक श्रीगणेशा झाला आहे. गणेशच्या कार्यक्षेत्रातील कोपरगाव मतदारसंघातील ११ गावात कोल्हेंना संघटन बांधणीसाठी या विजयाचा मोठा उपयोग होणार आहे तर आ.थोरातांची विखे विरोधांची धार आणखी तीव्र होणार आहे. राहाता मतदारसंघावरील विखेंचे एकहाती असलेले प्राबल्य लक्षात घेता त्यांना त्यांच्या मतदारसंघात नामोहरण करणे अशक्यच.
म्हणून विखेंना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यातील, राज्यातील विरोधकांनी कंबर कसली. या एकीमुळे विरोधकांना गणेशची सत्ता मिळवता आली. थोरात-कोल्हे युतीने दिग्गज नेते विखेंविरोधात लढण्याची जिगर दाखवत विजयश्री खेचून आणल्यामुळे त्यांचे राज्यभर कौतूक होत आहे. ते होणे रास्तच. कारण मैदान कुठलेही असो, प्रतिस्पर्धी जितका मोठा, तितका त्याला हरवल्याचा आनंदही मोठा. हे तत्व या निकालालाही लागू झाले.
त्यामुळे सध्या नगरच्या राजकारणात गणेशच्या निकालाचे कवित्व सुरू आहे. या निकालाचा आगामी राजकारणावर काय परिणाम होणार, थोरात-कोल्हेंनी विखेंच्या अडचणी कशा वाढवल्या, त्यांना आगामी विधानसभा सोपी नाही, अशी चर्चा माध्यमातून रंगवली जात आहे. विखेंसारख्या राज्याचे नेतृत्व करणाऱ्या दिग्गज नेत्याच्या पदरी असे अपयश येते, तेव्हा ती होणेदेखील साहजिक; पण ती चर्चा जेव्हा एकतर्फी होते, तेव्हा वास्तव मांडणे गरजेचे ठरते.
गणेशच्या निकालानंतरचे राजकारण समजून घेण्यासाठी गणेशचा राजकीय इतिहास ज्ञात असणे गरजेचे आहे. १९५७ साली स्थापन झालेला गणेश स्थापनेवेळी तत्कालीन कोपरगाव तालुक्यात होता. त्यामुळे स्थापनेपासून या गणेशच्या कार्यक्षेत्रातील मतदारांवर काळे-कोल्हेंचे वर्चस्व राहिले आहे. पुढे एकहाती सत्तेचा अभाव, ऊसाची कमी उपलब्धता, कार्यक्षेत्रात ऊसवाढीसाठी न झालेले प्रयत्न, अशा अनेक कारणांमुळे गणेश अडचणीत येत गेला. यातून मार्ग काढत ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव कोल्हेंनी अनेक वर्षे कारखाना चालवला. म्हणून त्यांचा कार्यकाळ कोल्हे पॅटर्न नावाने ओळखला गेला.
कोल्हेंचे समकालीन नेते माजी खासदार पद्मभूषण कै. बाळासाहेब विखे यांनी गणेशची निवडणूक लढवली; परंतु पडद्यामागून. जनतेसमोर तेव्हा चेहरा होते, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के; यात विखेंना यश आले नाही. थोडक्यात गणेशवर कधीच विखेंचे वर्चस्व राहिले नाही. पुढे मतदारसंघ पुनर्रचनेत गणेशच्या कार्यक्षेत्रातील ११ गावे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली. त्यामुळे कारखाना राहाता तालुक्यात, एकूण मतदानापैकी बहुतांशी मतदान कोपरगाव तालुक्यात. असा विरोधाभास गणेशच्या सभासदांच्या पदरी पडला. याचा परिणाम गणेशच्या कार्यक्षेत्रात कायम कोपरगावच्या राजकारणाचा पगडा राहिला.
२०११ मध्ये गणेश आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला. कारखाना बंद करणे, किंवा खासगी उद्योजकाकडे चालवायला देणे, असे दोनच पर्याय शिल्लक राहिले. अशा परिस्थितीत मंत्री विखेंनी गणेश परिसरातील शेतकरी व सभासदांच्या हितासाठी गणेश चालवायला घेतला. प्रवरा कारखान्यातून यासाठी गुंतवणूक केली. आठ वर्षात २० लाख टन उसाचे गाळप केले. कामगार, सभासदांची देणी दिली. नफा, तोट्याचा विचार करत त्यावेळी विखेंनी गणेश काराराने घेतला नसता, तर गणेश केव्हाच बंद पडला असता. किंवा विकला गेला असता अन् आज राज्यभर गाजलेली निवडणूक आणि विखे विरोधकांचा विजय उत्सवही पाहयला मिळाला नसता.
निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल विखेंनी मान्य केला आहे. त्यांच्या गटाचा झालेला पराभव स्वीकारला आहे; पण तरीही काही विरोधक विखेविरोध संपवायला तयार नाही. गणेशच्या निवडणुकीमुळे विखेंच्या अडचणी वाढल्या, विधानसभा त्यांना अवघड जाणार, असे अनेक ठोकताळे मांडले जात आहेत. ते मांडण्याविषयी दुमत नाही; पण ते मांडणारे विखेंच्या राजकारणाचा इतिहासही समजून घेत नाहीत.
निवडणूक कुठलीही असो, प्रत्येक निवडणुकीत विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी कधी जिल्ह्यातील, तर कधी राज्यातील नेते रसद पुरवतात; पण विखे हाच पक्ष माणणारी जनता आणि त्यांना असलेल्या जनाधाराच्या जोरावर प्रत्येक निवडणुकीत विखे विरोधकांचे आक्रमण परतावून लावतात. सत्ता, विजय यापेक्षा संघर्ष हाच विखेंचा पिंड आणि बलस्थान आहे. त्यामुळे एका गणेशच्या निवडणुकीमुळे विधानसभा विखेंना अवघड जाण्याची परिस्थिती निर्माण होणे, इतके सोपे नाही. राज्यातही अनेक दिग्गजांचा कारखान्यांच्या निवडणुकीत पराभव झाला, म्हणून विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला, असे घडले नाही.
विरोधक गणेशचा पराभव विखेंच्या आगामी निवडणुकांसोबत जोडत आहेत, गणेशच्या आधीही विखेंनी इतर संस्थांमध्ये पराभव पचवला आहे. म्हणून त्यांना विधानसभेला कधी अपयश आले नाही. मतदारसंघ म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी विखे करत असलेली मशागत लक्षात घेता विरोधकांची विरोधाची पेरणी राहात्यात तरी सोपी नाही. असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे. आता निवडणुकीनंतर प्रत्यक्ष गणेश चालवताना केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने थोरात- कोल्हेंना विखेंची मदत घ्यावीच लागणार आहे.
गणेशच्या निवडणुकीत जरी विखे या दोघांच्या विरोधात होते, तरी गणेशच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नव्हते. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री म्हणून भविष्यात जिथे गरज लागेल, तिथे गणेशच्या सभासद, कामगारांसाठी विखेंनाही गणेशच्या नवोदित सत्ताधाऱ्यांना मदत करावी लागणार आहे. थोरात-विखे हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते. दोघेही विधानसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य. त्यामुळे या दोघांमध्ये कितीही राजकीय मतभेद असले तरी त्यांना जनतेच्या हितासाठी दोन पावले मागे-पुढे यावेच लागणार आहे. हे सत्य गणेशच्या निकालानंतर विखेंचा द्वेष करणाऱ्यांनी समजून घ्यायला हवे. थोरात-कोल्हेंनी मिळवलेले या निवडणुकीतील यश मोठे आहे.
त्यामुळे त्याचा विजयोत्सव मोठाच साजरा होणार. यात शंका नाही. फक्त तो साजरा करताना समोर पराभूत झालेले विखे आहेत, हे विसरू नये आणि त्यांच्यातील बाजीगर होण्याचा हक्कही नाकारू नये, इतकेच.
लेखक दै. पुण्यनगरी वृत्तपत्रांच्या श्रीरामपूर कार्यालयाचे वृत्त संपादक आहेत.
विकास अंत्रे, मो. ९४२१५५६८८२