◻️ ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची आश्वी येथिल कार्यक्रमात माहिती
◻️ संगमनेर तालुक्यातील १६३ गावांतील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार
संगमनेर LIVE | सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पीकांची भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असून, तालुक्यातील ५४ हजार २६९ शेतकऱ्यांना ४५ कोटी ५७ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आश्वी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जुन २०२२ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीनंतर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. नुकसानीचे पंचनामे सादर करण्यात आले होते. मदतीच्या आलेल्या प्रस्तावाचा विचार करुन राज्य सरकारने अतिवृष्टीचा निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून तालुक्यातील १६३ गावांतील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
संगमनेर तालुक्यातील ५४ हजार २६९ शेतकऱ्यांना ४५ कोटी ५७ लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे मोकळा झालेला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे.
दरम्यान यापूर्वीही तालुक्यात गारपीटीमुळे नुकसान झालेल्या १५५ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपयांची मदत सरकारने घोषित केली असून, या मदतीचा निधीही शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.